बतावणी करून लुटणारे दोघे श्रीरामपूरमधून जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नाशिक - कधी जनगणना अधिकारी, तर कधी वीज कंपनीचे रीडिंग वा दुरुस्ती कर्मचारी अशी बतावणी करून घरात घुसून सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेणाऱ्या दोघा भामट्यांना नाशिक पोलिसांनी श्रीरामपूरमध्ये अटक केली. 

नाशिक - कधी जनगणना अधिकारी, तर कधी वीज कंपनीचे रीडिंग वा दुरुस्ती कर्मचारी अशी बतावणी करून घरात घुसून सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेणाऱ्या दोघा भामट्यांना नाशिक पोलिसांनी श्रीरामपूरमध्ये अटक केली. 

आठवडाभरापूर्वी म्हसरुळ, पंचवटीत एकाच दिवशी, तर दुसऱ्या दिवशी उपनगर परिसरात बतावणी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेणारे संशयित शंकर रामदास लाड (रा. पडेगाव, बेलापूर-पडेगाव रोड, ता. श्रीरामपूर, जि. नगर), संतोष एकनाथ वायकर (रा. बोंबले वस्ती, टिळकनगर रोड, तुळजाभवानी मंदिराशेजारी, श्रीरामपूर, जि. नगर) यांनी नाशिक पोलिसांची झोप उडवली होती. आठवडाभरापूर्वी या दोघांनी म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका बंगल्यात जाऊन महापालिकेचे जनगणना अधिकारी असल्याचे सांगत घरात प्रवेश केला. या वेळी एकाने नजर चुकवून सोन्याचे दागिने नेले, तर त्यानंतर काही तासांतच त्यांनी पेठ रोडवरील इमारतीमध्ये वीज कंपनीकडून रीडिंग व दुरुस्तीसाठी आल्याचे सांगत वृद्धेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या नेल्या. या दोन्ही घटना गेल्या 15 तारखेला घडल्या होत्या. पेठ रोडवरील घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे कैद झाले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा उपनगर परिसरात वीज कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून अशा रीतीने सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. 

पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील संशयितांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध केली. पोलिसांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या समन्वयाच्या सोशल मीडियावरही शेअर केले होते. त्यावरून संशयितांनी औरंगाबादमध्येही अशा रीतीने गुन्हे केल्याचे समोर आले. औरंगाबाद पोलिसांनी दोघांना अटकही केली होती. नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला दोघा संशयितांची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या पथकाने श्रीरामपूरमध्ये सलग तीन दिवस सापळा रचत या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील 12 तोळ्यांचे सोने, सुमारे तीन लाख 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली. संशयित चार दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. पथकात रवींद्र सहारे, विजय लोंढे, राजेंद्र जाधव, रमेश घडवजे यांचाही समावेश होता.

Web Title: marathi news nashik crime shrirampur