हसत-खेळत जा परीक्षांना सामोरे..! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

नाशिक - करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. या परीक्षांचं दडपण न घेता, आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे गेल्यास चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या उलट परीक्षेचा ताण घेतल्यास त्याचा गुणांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. बारावीच्या परीक्षेला बुधवार (ता.21) पासून, तर दहावीच्या परीक्षेला 1 मार्चपासून सुरवात होत असून, विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे दडपण न येऊ देता, या परीक्षांना हसत-खेळत सामोरे जावे, हाच परीक्षेतील यशाचा मूलमंत्र होय. 

परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील, तर त्यासाठी आत्मविश्‍वासाने अभ्यास करणे, विषयाच्या संकल्पना समजून घेणे, अभ्यास करत असताना दुसरीकडे झोप, आहार असे सर्व संतुलन साधणे याबाबी महत्त्वाच्या ठरतात. परीक्षा काळात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकांचीही कसोटी पणाला लागते. परीक्षेच्या काळात पालकांचीही महत्त्वाची भूमिका असते. सध्या पालकांना आपल्या पाल्याकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत. अपेक्षा ठेवणे साहजिक आहे. परंतु त्यासाठी पाल्यावर दबाव निर्माण करणे, त्याच्या करिअरसाठी घातक ठरू शकते, ही गोष्ट पालकांनीही लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा धाक दाखविण्यापेक्षा, त्याला परीक्षेविषयी दडपण येणार नाही, असे सुदृढ वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची असते. 

परीक्षेला सामोरे जाताना... 
*दडपण येऊ न देता अभ्यासावर द्यावा भर 
*विषयाच्या मूळ संकल्पना समजून घ्याव्यात 
*इतर विद्यार्थ्यांची आपली तुलना करायला नको 
*दैनंदिन नियोजनात झोप, पौष्टिक आहाराला द्या महत्त्व 
*आवश्‍यक शैक्षणिक साहित्य बाळगा स्वत:सोबत 
*विषयाचा पेपर झाल्यानंतर त्याचा पुन्हा विचार करायला नको 
*पेपर झाल्यानंतर एक तास विश्रांती ठरेल उपयोगी 
*विश्रांतीनंतर पुढील पेपरच्या अभ्यासाची करावी तयारी 
*दडपण जाणवत असल्यास पालक, मित्रांशी साधावा संवाद 
*परीक्षा संपल्यानंतर पर्यटन ठरू शकते ऊर्जा वाढविणारे 

ही परीक्षा शेवटची परीक्षा नाही, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी. परीक्षेला आत्मविश्‍वासाने सामोरे जावे. गुणांच्या आधारे कुणाचे यश ठरवता येऊ शकत नाही. पालकांनी आपल्या पाल्याला प्रोत्साहित केल्याने त्यांच्यावरील ताण कमी होईल. पुरेशी झोप, संतुलीत आहारामुळे विद्यार्थ्यांवर तणाव येणार नाही. कुठलीही परीक्षा शेवटची नसते, भरपूर संधी उपलब्ध असतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. 
-किरण बावा, समुपदेशक. 

अत्यंत अवघड वाटणारा गणित विषय प्रत्यक्षात अत्यंत सोपा आहे. विद्यार्थ्यांनी पाठांतरापेक्षा गणिताच्या संकल्पना समजून घेणे आवश्‍यक असते. प्रश्‍न सोडविण्याचा जास्तीत जास्त सराव केल्याने प्रश्‍नपत्रिका सोडविणे सोपे जाईल. पेपर सोडवितांना दडपण न येऊ देता, शांततेत प्रश्‍न समजून घेत सोडविल्यास अपेक्षित यश मिळवता येईल. 
-रोहित देवरे, शिक्षक. 

विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान तणाव येऊ नये, यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. बरेच पालक अन्य मित्रांशी आपल्या पाल्याची तुलना करणे चुकीचे आहे. याउलट आपल्या पाल्याला आनंददायी वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी पालकांनी बजवावी. 
-प्रवीण कोथमिरे, पालक. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nashik HSC SSC exam student