झुल्यावरील कसरतींतून प्रेमबंधन... त्यातून जुळल्या रेशीमगाठी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक - बिहारमधील दीपक जयस्वाल (वय 27) अन्‌ आसाममधील लवली (31) यांची केरळमध्ये जम्बो सर्कसमध्ये झुल्यावरील कसरतीतून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन्‌ सहा महिन्यांत दोघांनी रेशीमगाठ बांधली. या तरुण दांपत्याने सर्कस हेच कुटुंब अन्‌ कलावंत हीच जात मानली. अमर सर्कसमधील झुल्यावरील कसरतींद्वारे दोघे नाशिककरांचे मनोरंजन करताहेत. 

नाशिक - बिहारमधील दीपक जयस्वाल (वय 27) अन्‌ आसाममधील लवली (31) यांची केरळमध्ये जम्बो सर्कसमध्ये झुल्यावरील कसरतीतून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन्‌ सहा महिन्यांत दोघांनी रेशीमगाठ बांधली. या तरुण दांपत्याने सर्कस हेच कुटुंब अन्‌ कलावंत हीच जात मानली. अमर सर्कसमधील झुल्यावरील कसरतींद्वारे दोघे नाशिककरांचे मनोरंजन करताहेत. 

जमिनीपासून चाळीस फूट उंचावर दीपक- लवली कसरती करत असताना टाळ्यांचा कडकडाट करण्याचा मोह प्रेक्षकांना आवरत नाही. थरारक कसरती सादर करताना हात निसटला, तरीही चाळीस फुटांवरून खाली कोसळून अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते. पण दोघांच्याही हात आणि पायाचे संतुलन जबरदस्त असल्याने उंचावर कसरती सुरू असताना जमिनीवर जाळी उभारली जात नाही. याच कौशल्यामुळे ही जोडी देशभर परिचित आहे. 

कौटुंबिक परिस्थिती बिकट 
लग्नाआधी अन्‌ नंतरही दोघांची कौटुंबिक परिस्थिती बिकट राहिली. मात्र, त्यांनी सर्कस हे कुटुंब मानल्याने त्याबद्दलची फिकीर त्यांच्या बोलण्यातून डोकावत नाही. सर्व जातीधर्माचे कलावंत एकमेकांना मदत करत असल्याने बिकट परिस्थितीचे शल्य त्यांच्यामध्ये नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. लग्नासाठी दीपक आणि लवलीला संघर्ष करावा लागला, तरीही सर्कसमधील सहकाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केल्याने त्यांच्या वैवाहिक जीवनाचा "गुलाब' फुलला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, दोघेही भरभरून बोलत असताना सर्कसने आम्हाला जगायला शिकविल्याचा आनंदभाव नोंदवला. कलेच्या सादरीकरणासाठी परदेश प्रत्येकाला खुणावत असतो. मात्र, त्यास हे दोघे अपवाद आहेत. त्यांनी परदेशात न जाण्याचा निर्णय घेतला असून, देशवासीयांच्या मनोरंजनाला प्राधान्य दिले आहे. प्रेक्षकांनी दिलेले प्रेम कधीही विसरता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. पण हो, प्राण्यांवर बंदी असल्याने भविष्यात सर्कस कशी चालणार, याची भीती दोघांमध्ये आहे. 

मुलीला डॉक्‍टर करणार  
दीपक अन्‌ लवली या दांपत्याला दोन वर्षांची मुलगी आहे. स्नेहा असे तिचे नाव असून, सर्कसमध्ये आई-वडिलांच्या कसरतींचे प्रयोग पाहत लहानाची मोठी होतेय. दोघे कसरत सादर करत असतात, तेव्हा स्नेहाची काळजी सहकारी कलावंत घेतात. आमच्या गावात डॉक्‍टर नसल्याने मुलीला डॉक्‍टर करण्याची खूणगाठ दोघांनी बांधली. 

Web Title: marathi news nashik Jumbo circus love