भाजपच्या हिमगौरी आडके बनणार पहिल्या महिला स्थायी सभापती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नाशिक - यंदाच्या पंचवार्षिकमधील स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके, तर विरोधकांची मोट बांधून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापतिपदासाठी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच दोन महिलांमध्ये लढत होणार आहे. भाजपकडील सदस्यसंख्या लक्षात घेता श्रीमती आहेर-आडके यांच्या नावाच्या घोषणेची फक्त औपचारिकता राहिली असून, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिलेला स्थायी समिती सभापतिपदाचा मान मिळेल. 

स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक शनिवारी (ता. १७) सकाळी अकराला होत आहे. गुरुवारी (ता. १५) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. भाजपकडून प्रभाग सातच्या नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके यांनी तीन अर्ज दाखल केले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेची मोट बांधत संगीता जाधव यांचा अर्ज दाखल केला. स्थायी समिती सभागृहात सोळापैकी भाजपचे नऊ सदस्य, तर विरोधी गटात सात सदस्य आहेत. त्यामुळे भाजपच्या नऊ सदस्यांच्या बळावर श्रीमती आहेर-आडके यांना सहज सभापतिपदाचा मान मिळेल. त्यांनी गुरुवारी नगरसचिवांकडे तीन अर्ज सादर केले. त्यावर सूचक-अनुमोदक म्हणून महापौर रंजना भानसी, गटनेते संभाजी मोरुस्कर, सदस्या शांता हिरे, गणेश गिते, हेमंत शेट्टी, जगदीश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अर्ज दाखल करताना उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, जगदीश पाटील, मच्छिंद्र सानप, उद्धव निमसे उपस्थित होते.

शिवसेनेला चमत्काराची आशा
सभागृहात भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक याप्रमाणे सात सदस्य आहेत. श्रीमती आडके-आहेर यांचे सभापतिपदासाठी वरिष्ठ पातळीवरून नाव आल्याने भाजपमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे संगीता जाधव यांना उमेदवारी देऊन भाजपला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्रीमती जाधव यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. सूचक व अनुमोदक म्हणून काँग्रेसचे समीर कांबळे व शिवसेनेचे प्रवीण तिदमे, भागवत आरोटे व संतोष साळवे आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news nashik news bjp himgauri aadake