मोफत २५ टक्के प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

खामखेडा (नाशिक) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांनाही प्रतिथयश इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात. या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा असून प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांनी दिली.

खामखेडा (नाशिक) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांनाही प्रतिथयश इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात. या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा असून प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांनी दिली.

पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढू लागला असून त्याच प्रमाणात इंग्रजी शाळांची संख्याही वाढू लागली आहे. आर्थिक कुवत असणारे पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये दाखल करीत आहेत. परंतुआर्थिक परिस्थिती बेताची असलेले पालक आपल्या पाल्यांना इच्छा असूनही अशा शाळांमध्ये दाखल करू शकत नाहीत. हाच प्रश्न लक्षात घेवून शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी अशा शाळांमध्ये मोफत २५ टक्के प्रवेश देण्यासाठीची योजना हाती घेतली.

या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी प्रवेशअर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. या शाळांची नोंदणी सुरू होऊन ही प्रक्रिया सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यात ४६६ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ६५८९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पालकांमध्ये आधीच नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची उत्सुकता असल्याने प्रक्रिया चालू होताच १९४७ प्रवेशांची नोंदणी झालेली आहे. ६५८९ ह्या जागांसाठी दाखल होणाऱ्या नोंदणी अर्जातून सोडतीद्वारे विद्यार्थ्यांच्या शाळा निश्चित करण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरु राहणार आहे.त्यानंतर प्रवेशाची सोडतीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक सोडतीनंतर उर्वरित जागा, शाळा ऑनलाईन दिसणार आहेत.

पालकांनी नजिकच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी या पालकांची कागदपत्र जुळवाजुळ करण्यासाठी धावपळ वाढली आहे. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे विविध आरक्षण असलेल्या जाती, जमाती, अल्पसंख्याकांना पहिलीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे नाशिक जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील पालकांना पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी उत्पन्नाची अट नाही. मात्र अन्य जात संवर्गातील पालकांना एक लाख रुपयाच्या आतील उत्त्पानाचा दाखला गरजेचा आहे. अधिकाधिक पालकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांनी सांगितले.

Web Title: Marathi news nashik news economic poor students 25 percent quota english medium school