जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी भरवला आठवडे बाजार

aathvade-bajar
aathvade-bajar

सटाणा : ‘भाजी घ्या भाजी...’ अशा आरोळ्या मारून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लढवलेल्या कल्पना, शेतमाल विक्रीसाठी प्रत्येकाची अपेक्षित जागा पकडण्याची घाई...हे सर्व चित्र भाजी मंडईत नव्हे तर येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये आज पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहारिक ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत भाजी बाजार भरवण्यात आला.

या आठवडे बाजारात शेतकरी पाल्यांनी आपल्या शेतातील भाजी-पाला विक्रीसाठी आणल्‍यामुळे शाळेत आठवडी बाजाराचे चित्र निर्माण झाले होते. तर स्थानिक बाजारात महागडा असलेला भाजीपाला शाळेतील बाजारात स्वस्त मिळत असल्याने नागरिकांनीही या अनोख्या बाजारात भाजीपाला खरेदी करण्याचा आनंद लुटला.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने जिजामाता विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस. बी. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सी. झेड. गायकवाड आणि श्रीमती व्ही. ए. खैरनार यांनी इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थिनींसाठी शाळेत भाजीपाला बाजार उपक्रमाचे आयोजन केले होते.

शाळेच्या आवारात असलेल्या या बाजारात कोणी कांदे तर कोणी पपई विकायला आणली. शेवग्याच्या शेंगा, चिंचा, बोरे, कोबी तर कुणी मेथी, शेपू, कोबी, फ्लावर, बटाटे, कारली, वांगी, मिरच्या अशा विविध ताज्या भाज्या व फळे विक्रीसाठी आणली होती.

काहींनी तर भेळ, पाणीपुरी, ओले हरभरे, पाववडा, बटाटेवड्याचे स्टॉल मांडले होते. भाज्यांचा योग्य भाव ठरवत तागड्यात त्यांचे योग्य वजन करून पैसे मोजून घेताना विद्यार्थिनी दिसून येत होत्या. विविध खाद्यपदार्थ व भाजीपाला खरेदी करण्यासाठी पालक व नागरिकांनी गर्दी केली होती.

पाच-दहा व पंधरा रूपयांत भाज्या मिळत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. बाजारपेठेत लक्ष ठेवत असताना शिक्षकानाही खरेदीचा मोह झाला. या बाजारातून विद्यार्थिनींना व्यावहारिक ज्ञानाबरोबरच बेरीज, वजाबाकी, नफा-तोटा प्रत्यक्ष अनुभवास मिळाला.

या बाजारात सुमारे 10 ते 15 हजारांची उलाढाल झाल्याची माहिती प्राचार्य श्रीमती मराठे यांनी दिली. सटाणा शहरात दैनंदिन भाजीपाला बाजाराबरोबर शनिवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारापेक्षा शाळेतील बाजार स्वस्त असल्याचे खरेदीसाठी आलेल्या पालकवर्ग सांगत होता.

यावेळी उपमुख्याध्यापक पी.व्ही.सोनवणे, जे.बी.देवरे, एम.डी.पाटील, यू.पी.चव्हाण, आर.के.आहेर, एस.एस.सोनवणे, एस.बी.पाटील, ए.आर.सोनवणे, आर.डी.कापडणीस, जे.आर.पाटील, एस.के.जाधव, व्ही.एस.अहिरे, व्ही.एस.बच्छाव, यू.डी.गांगुर्डे, टी.बी.भदाणे आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com