पंचवटी एक्‍स्प्रेसमध्ये उंदरांचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

नाशिक - उंदीरमारीच्या आरोप-प्रत्यारोपात का होईना, मंत्रालय उंदीरमुक्त झाले. मात्र, पंचवटी एक्‍स्प्रेसमध्ये दिवसातील किमान दहा तास उंदरांकडून वर्षभर कुरतडले जाणारे प्रवासी या जाचातून कधी सुटणार, अशी विचारणा नाराज प्रवाशांनी आज केली. उत्तर महाराष्ट्रातील खडसे पंचवटीच्या उंदरांच्या बाबतीत काही करतील अशी पुसटशी आशा निर्माण झाल्याची कोपरखळी काही प्रवाशांनी मारली. आज प्रवासादरम्यान उंदराच्या कळपाने झोपलेल्या प्रवाशाचा पाय कुरतडल्याच्या घटनेमुळे पंचवटी एक्‍स्प्रेसमधील उंदरांच्या उपद्रवाला आळा घालण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.

रेल्वे डब्यातून निर्धोक फिरणारे उंदीर आता इतके निर्ढावलेत, की झोपलेल्या प्रवाशांचे उघडे अवयव झुंडीने कुरतडू लागले आहेत. आज पंचवटी एक्‍स्प्रेसच्या पाचव्या बोगीत मनमाड येथून रोज मुंबईचा दैनंदिन प्रवास करणाऱ्या रशीद शेख यांच्या पायाला भिडलेली उंदारांची झुंड बोगीतील सहप्रवासी निर्मला गोसावी यांच्या लक्षात आल्याने रशीद यांचा पाय चाव्यांवरच निभावला. त्यांच्या पायावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

संसर्गजन्य रोगांच्या छायेत प्रवास
उंदरांच्या चाव्यामुळे डोकेदुखी, "रॅट बाइट फिव्हर'सारख्या साधारण दुखण्यापासून किडनी फेल्युअरला कारणीभूत ठरणाऱ्या लेप्टोस्पायरोसिससह अनेक संसर्गजन्य रोगांचा संभव असतो. उंदरांच्या चाव्यांच्या प्रकारामुळे प्रवाशांच्या आयोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहेत. प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी-पत्रव्यवहार करूनही या उंदरांचा बंदोबस्त करण्याबाबत कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजले.

पंचवटी एक्‍स्प्रेसमध्ये उंदरांचा उच्छाद ही नेहमीची समस्या झाली आहे. यावर अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. प्रवाशांच्या आरोग्याशी व त्याहीपलीकडे प्रवाशांच्या जिवाशी चाललेला हा खेळ प्रशासनाने थांबवावा.
- देविदास पंडित, रेल्वे प्रवासी संघटना

Web Title: marathi news nashik news mouse in panchwati express