शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणांचे दालन खुले!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यायला हवेत, त्यादृष्टीने वाचन करावे, विचार करावा आणि पुढे जाण्याची दिशा निश्‍चित करावी
- राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक

नाशिक - सामाजिक जीवनातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक- प्राध्यापक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी साकारलेल्या बौद्धिक संकल्पनांचे आविष्कार अन्‌ प्रकल्पांचे दालन नाशिककरांसाठी आजपासून खुले झाले आहे. ‘सकाळ’च्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झालेल्या ‘नाशिक इनोव्हेशन फेस्ट’मध्ये शेतीसाठी उपयुक्त उपकरणांचा समावेश आहे.

विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते ‘फेस्ट’च्या उद्‌घाटनाचा शानदार सोहळा झाला. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेला जोडणाऱ्या व्यवस्था, सौरऊर्जेवर चालणारी शेतीची उपकरणे, शेतीची अवजारे, कृषी प्रक्रिया, पाणलोट क्षेत्र विकासापासून ते जगण्यासाठीच्या स्मार्ट तंत्राचा आणि सुरक्षेसाठीचा रोबोट आदींचा ‘फेस्ट’मध्ये समावेश आहे. वैद्यकीय, वास्तुविशारद, औषधनिर्माणशास्त्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी आपल्या संशोधनासह ‘फेस्ट’मध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रीयस्तरावर निवड झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांनी आपली उपकरणे ‘फेस्ट’मध्ये ठेवली आहेत.

Web Title: marathi news nashik news nashik innovation fest