वर्षभरात दोनशेपेक्षा जास्त नवीन उद्योग अन्‌ 50 उद्योगांचा विस्तार 

सतीश निकुंभ
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सातपूर : सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींत 2017-18 या वर्षात दोनशेपेक्षा जास्त नवीन उद्योग सुरू झाले असून, पन्नासपेक्षा जास्त मोठ्या उद्योगांनी आहे त्या जागेवर शेकडो कोटींच्या गुंतवणुकीद्वारे विस्तार केला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गेल्या वर्षभरात हजारो कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा 'एमआयडीसी'ने केला आहे. 

सातपूर : सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींत 2017-18 या वर्षात दोनशेपेक्षा जास्त नवीन उद्योग सुरू झाले असून, पन्नासपेक्षा जास्त मोठ्या उद्योगांनी आहे त्या जागेवर शेकडो कोटींच्या गुंतवणुकीद्वारे विस्तार केला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गेल्या वर्षभरात हजारो कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा 'एमआयडीसी'ने केला आहे. 

मॅग्नेटिक महाराष्ट्र या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने नाशिक एमआयडीसी कार्यालयातील आकडेवारीनुसार ही वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आल्याने मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत विदेशी गुंतवणुकीसाठी नाशिक सज्ज झाल्याचे प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

एमआयडीसीने उद्योग विस्ताराकडे विशेष लक्ष देत जिल्ह्यातील बहुतांशी मोकळ्या भूखंडधारकांना नोटीस पाठवून उद्योग उभारा, अन्यथा जागा परत द्या, असे धोरण स्वीकारल्यामुळे अनेक उद्योजकांनी छोटे-मोठे उद्योग उभे केले. काहींनी बांधकामाची परवानगी घेऊन सुरवात केली. मोठ्या उद्योगांनीही नवीन उत्पादनसाठी शेकडो कोटींची गुंतवणूक करून विस्तार केला. सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, विंचूर, मालेगाव, पेठ आदी ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. 

दरम्यान, सातपूर व अंबड क्षेत्रात जागा उपलब्ध नसतानाही मागणी अधिक आहे. दिंडोरी- 201 हेक्‍टर, मालेगाव शहरालगत- 113 हेक्‍टर व अजंग (मालेगाव) येथे 345 हेक्‍टर, सिन्नरला एक हजार हेक्‍टर, येवला- 107 हेक्‍टर, विंचूर- 44 प्लॉट उपलब्ध आहेत. पेठ येथील वाइन पार्कमध्येही 15 प्लॉट उपलब्ध आहेत. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर भूसंपादनाची प्रक्रिया झाली असून, नवीन उद्योगांना तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

असा आहे उद्योगविस्तार 

  • सातपूर औद्योगिक वसाहतीत गेल्या वर्षभरात 59 नवीन उद्योग सुरू झाले आहेत. महिंद्र, बॉश, इपिरॉक, एबीबी, इप्कॉस, नीलय इंडस्ट्री आदींनी विस्तार केला. नाईस, गंगामाई या गाळे प्रकल्पांतही अनेक नवीन लघुउद्योग सुरू झाले. 
  • अंबडला 86 भूखंडांवर नवीन उद्योग सुरू झाले, तर आठ कंपन्यांनी उद्योगविस्तार केला. 
  • येवला येथे वाइन पार्कचे नियोजन होते. तेथील उर्वरित जागेत अन्य उद्योगांकडूनही मागणी आल्याने जानेवारी 2017 मध्ये नव्याने दोन फूड प्रोसेसिंग उद्योगांची भर पडली. 
  • मालेगाव व लगतच्या औद्योगिक क्षेत्रात टेक्‍स्टाइल पार्कनिर्मितीचा प्रयत्न आहे. अजंग गावाजवळील शेती महामंडळाची साडेसातशे हेक्‍टर जमीन नुकतीच एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यातच भिंवडी आदी भागातील टेक्‍स्टाइल कंपन्यांना 'एमपीसीबी'ने दणका दिल्याने त्या मालेगावात हलविण्याच्या दृष्टीने व विस्ताराच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत विदेशी गुंतवणुकीसाठी या भागाचे मंत्री दादा भुसे व एमआयडीसीही प्रयत्न करणार आहे. 
  • सिन्नर तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतींत गेल्या दोन वर्षांत ज्या लघुउद्योगांनी बांधकाम परवानगी घेतली, त्यांपैकी 77 उद्योग सुरू झाले. काहींचे बांधकाम सुरू आहे. 58 कंपन्यांनी विस्तार केला आहे. याव्यतिरिक्त गेल्या वर्षभरात 22 नवीन उद्योग सुरू झाले आहेत. 
  • पेठ वसाहतीचा शासनाने 'डी झोन'मध्ये समावेश करून नवीन उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या. या भागात नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित होत असल्याने वर्षभरात तीन नवीन उद्योग सुरू झाले आहेत. 
  • दिंडोरीत वर्षभरात तीन नवीन उद्योग सुरू झाले. या भागातही मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झाले आहे. जवळच ओझर विमानतळ, कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी आणि डिफेन्सचाही मोठा उद्योग यावा यासाठी एमआयडीसीचे स्थानिक अधिकारी व औद्योगिक संघटनांनी शासनाकडे तगादा लावला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही त्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेसाठी नाशिक विभागातून जवळपास 30 मोठ्या उद्योगांची यादी तयार करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मिळणाऱ्या जागेचा विचार करून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या उद्योजकांना त्यात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
- हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी 

गेल्या वर्षभरात भूसंपादनाबरोबरच मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी बांधकाम व इतर परवानग्या त्वरित दिल्या जात असल्याने विदेशी गुंतवणुकीसाठी एमआयडीसी सज्ज आहे. 
- नितीन वानखेडे, अधीक्षक अभियंता

Web Title: marathi news nashik news nashik midc Development