चंद्रकांतदादांच्या मोहिमेला सार्वजनिक बांधकाम विभागानेच पाडले खड्डे

संतोष विंचू
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

“सहा महिन्यापूर्वीच नाशिक येथे आल्याने अडीच वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या कामांविषयी माहिती नाही.रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास ठेकेदार तयार होत नव्हते. त्यामुळे आम्ही काही ठेकेदारांना तयार करुन खड्डे बुजविण्याचे काम केले आहे.गुणवत्ता नियंत्रण विभागाने या कामांची पाहणीही केली आहे.”
- सुर्यकांत आहिरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,नाशिक

येवला : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राबवलेल्या रस्ते खड्डे मुक्त मोहिमेला बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनीच खड्डे पाडून मोहीमच खड्ड्यात चालवली आहे. या दुरुस्तीच्या नावाखाली डांबर खरेदीपासून तर इतर कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची त्वरीत चौकशी करावी, यासाठी शुक्रवारी (ता.१६) प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा मजुर संघाचे संचालक संभाजी पवार व शिवसनेने दिला आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना लेखी निवेदन यापूर्वीच पाठविले आहे. तसेच येथील अधिकाऱ्यांना देखील त्यांनी निवेदन दिले आहे. येथील बांधकाम उपविभाग क्र. १ व २ या दोन विभागाअंतर्गत खड्डे भरताना आपल्या मैल कामगारांचा वापर करीत काही ठेकेदारांच्या नावाखाली कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सहाय्यक अभियंत्यांनी ही कामे स्वत:च केली. यासाठी अत्यल्प डांबर वापरुन उर्वरित डांबराची परस्पर विक्री करुन विल्हेवाट लावली आहे. जिल्ह्यात अनेक डांबर विक्रेते असताना जिल्ह्या बाहेरुन जालना येथून डांबर विकत घेतल्याचे पुरावेही आपणाकडे असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. खड्डेमुक्त करताना अधिकार्‍यांनी शासनालाच खड्ड्यात घालण्याचा प्रकार केला असून या कामांची निरपेक्षपणे चौकशी करण्यासाठी त्रयस्थ अधिकार्‍याची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र अधिक्षक अभियंत्याची कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक केल्याने
याबाबतही शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

मालेगाव- मनमाड- कोपरगाव या राज्य महामार्गाचे नियमाने पाच वर्षात संपूर्ण डांबरीकरण करणे आवश्यक असतांना ‘बीओटी’ तत्वावर नागपूर येथील इन्फ्रास्ट्रक्चर टोल कंपनीने अधिकार्‍यांशी संगनमत करुन केवळ खड्डे भरून हि जनतेची फसवणुक सुरु आहे. सन २०१४ मध्ये सुमारे ४ कोटी रुपयाची करंट रिपेरिंगच्या (सी. आर.) कामांमध्ये सुद्धा संगनमताने अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार करुन शासकीय निधीत लयलुट केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

कोटमगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षापूर्वी करण्यात आले असून अंदाजपत्रका प्रमाणे या पुलाचे काम न करता अन्य बाबी वाढवून कामाअंतर्गत गैरप्रकार झाल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली असून पर्यटन विभागाच्या अंतर्गत अनकुटे, सावरगाव, विठ्ठलाचे कोटमगाव, देवीचे कोटमगाव, बोकटे, अंदरसूल या ठिकाणी बांधकामासाठी साहित्याची वाहतुक अंदाजपत्रकात दूरवरुन दाखविण्यात आली. प्रत्यक्षात गावाजवळील स्थानिक पातळी वरुनच साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या गंभीर बाबीची सखोल चौकशी करण्याची मागणीही शिवसेनेचे पवार यांनी या निवेदनात केली आहे. 

“सहा महिन्यापूर्वीच नाशिक येथे आल्याने अडीच वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या कामांविषयी माहिती नाही.रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास ठेकेदार तयार होत नव्हते. त्यामुळे आम्ही काही ठेकेदारांना तयार करुन खड्डे बुजविण्याचे काम केले आहे.गुणवत्ता नियंत्रण विभागाने या कामांची पाहणीही केली आहे.”
- सुर्यकांत आहिरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,नाशिक

Web Title: Marathi news Nashik news potholes in Yeola