मीटर रिडिंग अन्‌ जनगणनेचा बहाणा करून ऐवज लुटला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

नाशिक : पेठरोडवर एका घरात मीटर रिडिंगचा बहाणा करून 60 वर्षीय वृद्धेचे 50 हजार रुपयांचा दागिने तर म्हसरुळ परिसरात जनगणना करण्याचा बहाणा करून बंगल्यात शिरलेल्या दोघांनी 77 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटना गुरुवारी (ता.15) घडल्या असून दोघा संशयितांनी बहाण्यानेच घरात प्रवेश करून सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी व म्हसरुळ पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नाशिक : पेठरोडवर एका घरात मीटर रिडिंगचा बहाणा करून 60 वर्षीय वृद्धेचे 50 हजार रुपयांचा दागिने तर म्हसरुळ परिसरात जनगणना करण्याचा बहाणा करून बंगल्यात शिरलेल्या दोघांनी 77 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटना गुरुवारी (ता.15) घडल्या असून दोघा संशयितांनी बहाण्यानेच घरात प्रवेश करून सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी व म्हसरुळ पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

म्हसरुळ परिसरात जनगणना करण्यासाठी आल्याचे सांगून घरात प्रवेश करून दोघा संशयितांनी 77 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दोन घड्याळे चोरून नेल्याचा प्रकार घडला. दीपक देवराम वाळके (रा. गितानगर, दिंडोरीरोड, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.15) सकाळी साडेदहा- अकरा वाजेच्या सुमारास दोघे संशयित दीपक वाळके यांच्या बंगल्यात आले. त्यांनी जनगणना कर्मचारी सांगत वाळके सरांशी ओळख आहे, असे सांगून उघड्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बोलण्यामध्ये गुंतवून व नजर चुकवून बेडरुममधील कपाटातून सोन्याची चैन, सोन्याच्या अंगठ्या, दोन घड्याळे व रोकड असा 77 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. संशयित निघून गेल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर, दुसरी घटना पेठरोडवर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पंचवटीतील पेठरोड परिसरात मीटर रिडिंगचा बहाणा करून घरात शिरलेल्या एकाने वृद्ध महिलेचा गुडघा चोळून देण्याचे सांगून तिच्या अंगावरील 50 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. जयश्री दिलीप जोशी (60, रा. भक्तीधामसमोर, पेठरोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.15) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघे संशयित मीटर रिडिंग घेण्याच्या बहाण्याने घरात शिरले. यावेळी जयश्री जोशी या लंगडत असल्याचे पाहून एका संशयिताने गुडघ्याची नस चोळून मोकळी करून देतो असे म्हणत त्यांना त्यांच्या अंगावरील दागिने एका डब्यात काढून ठेवायला सांगितले. तर दुसऱ्या संशयिताने वृद्धेच्या पतीची नजर चुकवून डब्यातील दागिने काढून घेतले. त्यानंतर दोघे निघून गेले असता, वृध्देने डबातील दागिने पाहिले तर ते मिळून आले नाहीत. संशयितांनी 50 हजार रुपयांचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र, एक अंगठी, कानातील झुबे असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संशयित सीसीटीव्हीत कैद 
दरम्यान, वीज वितरण कंपनीतर्फे मीटर रिडिंग घेण्याचा बहाणा करणाऱ्या दोघे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नाशिक पोलिसांनी दोघांचा छायाचित्र जारी करीत दोघे संशयित कुठे दिसल्यास वा माहिती असल्यास तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधण्याचे वा टोल फ्रि क्रमांक 100 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Marathi news nashik news robbery meter reading