भुजबळ यांनी स्थापन केलेल्या समता परिषदेचे योगदान महत्त्वाचे: पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे, नाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष  छगन भुजबळ यांनी देशातील पिडीत व वंचित घटकांपर्यत महात्मा जोतीराव फुले यांचे विचार पोहचवून त्यांना आपला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केले.

आज महात्मा जोतिराव फुले यांच्या १२७ व्या पुण्यतिथी निमित्ताने फुले वाडा पुणे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता पुरस्काराच्या वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व देशाचे केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक डॉ. मा. गो. माळी यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री ना.उपेंद्र कुशवाह,समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,  समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, बापू भुजबळ, आ.पंकज भुजबळ, आ.जयवंतराव जाधव, आ.जयदेव गायकवाड़,  माजी आ.तुकाराम बिड़कर,कमल पाटिल, माजी महापौर अंकुश काकड़े,डॉ.कैलास कमोद,राजस्थानचे प्रमुख मोतीलाल साखला,उपाध्यक्ष अरविंद जामदाडे, दिलीप खैरे,भगवान बिडवे,  महानगर प्रमुख प्रीतेश गवळी, महिला प्रमुख मंजिरी घाटगे, यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून आलेले समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी स्थापन केलेली महात्मा फुले समता परिषद आज संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यात पोहचली असून देशातील पिडीत व वंचित घटकातील न्याय हक्कासाठी मोलाचे काम करत आहे. तसेच उत्तरभारतात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्य वाढविण्यासाठी ना.उपेंद्र कुशवाह यांचे काम मोठे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय समता परिषद व छगन भुजबळ यांच्या सतत पाठपुरावा व लढयामुळे आज संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा उभारला गेला आहे. त्यामुळे देशातील खासदारांनी संसदेत प्रवेश करत असतांना त्यांना अभिवादन करून त्यांचे समतेचे विचार जोपासण्यासाठी काम त्यांच्या हातून घडावे हा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आधुनिक विज्ञानाचे पुरस्कर्ते देशाला विकासाची दृष्टी देणारे महात्मा जोतिराव फुले यांचे विचार राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले यांनी शेतकरी हितासाठी, स्त्री शिक्षणासाठी, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी काम केले. आधुनिक भारताचे विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी ब्रिटीश सरकारकडे  शेतमालाचे व दुधाचे संकरीत वान निर्माण करण्याची मागणी केली. त्यातून शेतकऱ्याचे शेतमालाचे व दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते असे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी साखर शाळेला प्रोत्साहन देणारे डॉ.मा.गो.माळी यांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सन्मान केला ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह म्हणाले की, समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ आज संकट काळातुन जात असून आपण सर्व त्यांच्या सोबत आहे. आज ते कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाही याची खंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या न्याय व्यवस्थेत खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळण्यासाठी ओबीसी,एससी, एसटी समाजातील नागरिकांना न्याय व्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत देशात त्यांना स्थान मिळत नाही तोपर्यंत देशात खऱ्या अर्थाने समाजिक न्याय मिळू शकत नाही असे सांगून देशात आजही पक्षपात सुरु असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ओबीसींना खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच लवकरच इतर मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार असून ओबीसींना त्यांच्या न्याय हक्क मिळविण्यासाठी कोणीही बाधा आणू शकत नाही असे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी बोलतांना राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, छगन भुजबळ हे लढवय्या नेते असून त्यांना गेल्या दोन वर्षापासून कायद्याच्या कचाट्यात अडकविण्यात आले आहे. मात्र आता तो कलमच रद्द झाल्याने छगन भुजबळ यांना लवकरच जामीन मिळेल आणि ते लवकरच आपल्यात दिसतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे त्यांनी यावेळी सांगितले. छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवले आहे. ते संघर्ष करणारे नेते असून न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी ते बाहेर असण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  

यावेळी डॉ. मा. गो. माळी म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने माझा समता पुरस्कार खा.शरद पवार यांच्या हस्ते देऊन गौरव केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील स्मरणीय क्षण असल्याचे ते म्हणाले. तळागाळातील लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्यासाठी तसेच महात्मा जोतीराव फुले यांचे विचार पोहचविण्यासाठी समता परिषदेचे काम मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच महात्मा जोतीराव फुले यांचे पाच खंड त्यांनी संपादित केले असून प्रकाशन असून रखडलेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सदर खंड समता परिषदेकडून प्रकाशित करण्यात येतील असे आश्वासन त्यांना दिले.

प्रारंभी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी छगन भुजबळ यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा घेत. महात्मा फुले वाड्यातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी खा.शरद पवार यांनी लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली. यावेळी आ.जयदेव गायकवाड, माजी आ. कमल पाटील, राजस्थानचे प्रमुख मोतीलाल साखला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com