बालमावळ्यांनी केला 'शिवबाचा' जयजयकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

शिवरायांचा जन्म, बालपण, शिक्षण, पुण्याचा कायापालट, स्वराज्याचे तोरण बांधले, प्रतापगडावरील पराक्रम, शर्थीने खिंड लढवली, बादशहाचा वाढदिवस, गड आला पण सिंह गेला, शिवरायांचा राज्याभिषेक आरमार दल, राजमुद्रा या पाठांसोबतच शिवनेरी, लालमहाल, राजगड, तोरणा, विजयदुर्ग, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, जंजिरा, पुरंदर, या किल्ल्यांची चिञरूपी माहितीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते

निफाड : 'रयतेच्या राजा'च्या जन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी तयार केलेल्या द्विमिती चित्रातून विद्यार्थ्यांना शिवचित्रसृष्टीचे दर्शन घडवले.

इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील शिवछत्रपतींचा संपूर्ण जीवनपट द्विमीती, त्रिमीती चित्रस्वरूपात तयार केला आहे. टी. व्ही. फ्रीज यांच्या वाया गेलेल्या रिकाम्या खोक्यांचा वापर करून अतिशय कमी खर्चात आकर्षक व टिकाऊ असा शिवरायांचा जीवनपट तयार करण्यात आला आहे.

यामध्ये शिवरायांचा जन्म, बालपण, शिक्षण, पुण्याचा कायापालट, स्वराज्याचे तोरण बांधले, प्रतापगडावरील पराक्रम, शर्थीने खिंड लढवली, बादशहाचा वाढदिवस, गड आला पण सिंह गेला,  शिवरायांचा राज्याभिषेक आरमार दल, राजमुद्रा या पाठांसोबतच शिवनेरी, लालमहाल, राजगड, तोरणा, विजयदुर्ग, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, जंजिरा, पुरंदर, या किल्ल्यांची चिञरूपी माहितीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. वैनतेय प्राथमिक विभाग, शिशूविहार, इंग्लिश मिडिअम, वैनतेय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत बहुसंख्य पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

रोहन सोनवणे, नरेंद्र पुरी या विद्यार्थ्यांनी शिवरायांची वेषभूषा केली. बाल मावळ्यांनी भगवे झेंडे नाचवत शिवबाचा जयजयकार केला. 'माझ्या शिवबाची तलवार' हे गीत सादर करत चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. किरण खैरनार यांनी शिवरायांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

तसेच टाकाऊ वस्तूंचा वापर करून कमी खर्चात विद्यार्थ्यांना शिवरायांचा जीवनपट 'शिवचित्रसृष्टी'च्या रूपाने सादर केलेल्या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्थ वि. दा. व्यवहारे, अॅड. ल. जि. उंगावकर, राजेश सोनी, राजेंद्र राठी, किरण कापसे, अॅड. दिलीप वाघावकर, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापिका मालती वाघावकर, अलका जाधव व पालकांनी अभिनंदन व कौतुक केले. शिवचित्रसृष्टी साकारण्यासाठी  शिक्षक गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Marathi News Nashik News Shivjayanti Bal mavala