सटाण्यात भगव्या रॅलीने शिवसेनाप्रमुखांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

शिवसेनेच्या रिक्षा युनियनचे किरण मोरे यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या अॅपे रिक्षातून दिवसभर सटाणा ते ताहाराबाद मोफत प्रवासी वाहतूक केली.

सटाणा : शहर व तालुक्यात आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली. सटाणा शहर शिवसेनेतर्फे भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, आज हिंदू रक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सटाणा शहरातून काढण्यात आलेली मोटारसायकल व रिक्षाची भगवी रॅली प्रमुख आकर्षण ठरले.

आज सकाळी दहा वाजता शहरातील चार फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात शिवसैनिक एकत्रित आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ.प्रशांत सोनवणे व शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यासह (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर भगव्या रॅलीस सुरवात झाली.

शहरातील टिळकरोड, चावडी चौक, महालक्ष्मी मंदिर, यशवंतराव महाराज मंदिरा मार्गे ताहाराबाद नाका व विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरून मालेगाव रस्त्यावरील शेतकरी संघात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत शिवसेनेच्या तालुका व शहर कार्यकारणीतील पदाधिकारी व शिवसैनिकांसह १०० हून अधिक रिक्षा व दुचाकीला भगवे झेंडे लावून सहभाग घेतला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा जयघोष केल्याने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. 

रॅलीत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख आनंदा महाले, तालुका संघटक मुन्ना सोनवणे, अंबादास सोनवणे, सुभाष नंदन, लक्ष्मीनारायण भन्साळी, अनिल सोनवणे, शरद शेवाळे, राजनसिंह चौधरी, बापू कर्डीवाल, सचिन सोनवणे, अमोल पवार, दिलीप शेवाळे, सीताराम जाधव, नंदू सोनवणे, अमोल पगार, ललित सोनवणे, दुर्गेश विश्वंभर, विक्रांत पाटील, शुभम सोनवणे, सागर सोनवणे, राजू जगताप, प्रवीण सोनवणे, शिवा सोनवणे, गिरीश शिरोडे, बाजीराव सोनवणे, रवींद्र सोनवणे, अशोक खैरनार, पप्पू शेवाळे, निरंजन बोरसे आदींसह शिवसैनिक सहभागी होते.

दरम्यान, शिवसेनेच्या रिक्षा युनियनचे किरण मोरे यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या अॅपे रिक्षातून दिवसभर सटाणा ते ताहाराबाद मोफत प्रवासी वाहतूक केली. या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला. तालुक्यातील नामपूर येथे बाजार समितीमध्ये शिवसैनिकांतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. ताहाराबाद येथे ग्रामीण रुग्णालयात आज मुलीस जन्म देणाऱ्या मातेचा सत्कार करण्यात आला

Web Title: Marathi news Nashik news shivsena chief memorise Greetings