सोनई तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी दोषींना शिक्षा उद्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

राज्यभर गाजलेल्या या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाहिले. यात 53 साक्षीदार तपासण्यात आले असून, एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे सादर करीत आरोपींना दोषी ठरविण्यात आले.

नाशिक : बहुचर्चित सोनई (जि.अहमदनगर) येथील तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सहा आरोपींना उद्या (ता.18) शिक्षा ठोठावली जाणार आहे. नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश आर. आर. वैष्णव यांनी गेल्या सोमवारी (ता.15) सातपैकी सहा जणांना खून, खुनाचा कट रचणे, याप्रकरणी दोषी ठरविले.

राज्यभर गाजलेल्या तीन दलित युवकांच्या निर्घृण हत्त्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सहा आरोपींना फाशी की जन्मठेप सुनावली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, नेवासा सत्र न्यायालयामध्ये सुरू असलेला खटला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हलविण्यात आल्यापासून न्यायधीश आर. आर. वैष्णव यांच्यासमोर खटला सुरू होता. समाजातील वरच्या जातीतील मुलीशी दलित समाजातील युवकाचे असलेल्या प्रेमप्रकरणातून 1 जानेवारी 2013 रोजी सचिन सोहनलाल घारू (23), संदीप राज थनवार (26), राहुल कंडारे (26) या तिघांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सात आरोपींपैकी सहा जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. यात प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांचा समावेश असून, उद्या (ता.18) त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. तर अशोक फलके यास गेल्या सोमवारी (ता.15) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

राज्यभर गाजलेल्या या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाहिले. यात 53 साक्षीदार तपासण्यात आले असून, एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे सादर करीत आरोपींना दोषी ठरविण्यात आले. आरोपींतर्फे अॅड. अविनाथ भिडे, राहुल कासलीवाल यांनी कामकाज पाहिले. संवेदनशील खटला असल्याने उद्या न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

Web Title: Marathi news nashik news sonai murder case tomorrow will punishment