सोनई तिहेरी हत्याकांड; अंतिम निकाल 20 जानेवारीला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

बहुचर्चित सोनई (जि. नगर) येथील तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सहा आरोपींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी गेल्या सोमवारी (ता. 15) सातपैकी सहा जणांना खून, खुनाचा कट रचणे याप्रकरणी दोषी ठरविले होते. 

नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या शनिवारी (ता 20) देण्यात येणार आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांनी अंतिम युक्तिवाद करताना दोषी 6 आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. जिल्हा सत्र न्यायाधीश आर आर वैष्णव हे अंतिम निकाल 20 तारखेला देणार आहेत.

बहुचर्चित सोनई (जि. नगर) येथील तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सहा आरोपींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी गेल्या सोमवारी (ता. 15) सातपैकी सहा जणांना खून, खुनाचा कट रचणे याप्रकरणी दोषी ठरविले होते. 

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये नेवासे सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हलविण्यात आल्यापासून न्या. वैष्णव यांच्यासमोर सुरू होता. समाजातील वरच्या जातीतील मुलीशी दलित समाजातील युवकाचे असलेल्या प्रेमप्रकरणातून एक जानेवारी 2013 ला सचिन सोहनलाल घारू (वय 23), संदीप राज थनवार (26), राहुल कंडारे (वय 26) यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सात आरोपींपैकी सहा जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. यात प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, पोपट विश्‍वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक सुधाकर नवगिरे व संदीप माधव कुऱ्हे यांचा समावेश आहे.

राज्यभर गाजलेल्या या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारपक्षातर्फे बाजू मांडली. यात 53 साक्षीदार तपासण्यात आले. एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे सादर करीत आरोपींना दोषी ठरविण्यात आले. ऍड. अविनाश भिडे, ऍड. राहुल कासलीवाल यांनी आरोपींतर्फे कामकाज पाहिले.

Web Title: Marathi news Nashik news Sonai murder case verdict