सोनई हत्याकांडातील 6 दोषींना फाशी

विनोद बेदरकर
शनिवार, 20 जानेवारी 2018

या निकालाविषयी बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, की जातव्यवस्थेचा रोग पसरू नये, असे न्यायाधीशांनी सांगितले. समाजामध्ये जात आणि धर्म याचे भांडवल करणारे नागरिक आहेत. न्यायालयाने याचे कठोर शब्दांत निंदा करत ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

नाशिक - नगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी खून खटल्यातील न्यायालयाने खून आणि कटात दोषी ठरविलेल्या सहाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. 

आज (शनिवार) या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावत 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. आरोपींच्या वकिलांनी कमी शिक्षा द्यावी, अशी तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यावर युक्तिवाद केला होता. अखेर न्यायालयाने यांना फाशीची शिक्षा सुनावली.

या प्रकरणातील सात दोषींनी प्रेमप्रकरणातून सचिन सोहनलाल घारू, संदीप राज धनवार, राहुल कंडारे यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप होता. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन 15 जानेवारीला न्यायालयाने सहा आरोपींना खून व कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरून दोषी ठरविले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता.

या निकालाविषयी बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, की जातव्यवस्थेचा रोग पसरू नये, असे न्यायाधीशांनी सांगितले. समाजामध्ये जात आणि धर्म याचे भांडवल करणारे नागरिक आहेत. न्यायालयाने याचे कठोर शब्दांत निंदा करत ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

अशी होती घटना...
नेवासे फाटा येथील घाडगे पाटील महाविद्यालयातील एका मुलीच्या मेहतर समाजाच्या मुलावरील प्रेमप्रकरणातून 1 जानेवारी 2013 ला सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज थनवार (वय 24), राहुल कंडारे (26), सचिन घारू (वय 23) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये सचिन, संदीप व राहुल कामाला होते. मेहतर समाजाच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वस्तीवरील स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची असल्याचा बहाणा करून सचिन घारूसह संदीप धनवार व राहुल कंडारे यांना बोलावले. या वेळी आरोपी प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, पोपट विश्‍वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांनी सचिन घारू याला सेफ्टी टाकीमध्ये बुडवून मारले, तर संदीप धनवार, राहुल कंडारे यांना कोयत्याने ठार केले. त्यानंतर तिघांच्याही मृतदेहांचे वैरण कापण्याच्या अडकित्त्याने तुकडे करून ते विहिरीतील बोअरमध्ये टाकून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक करत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सुरवातीला राजकीय दबावातून हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे मृत संदीप धनवार याच्या लष्करातील भावाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत खटला नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालविण्याची विनंती केली. त्यानुसार खंडपीठाने याचिकाकर्त्याचे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून विनंती मान्य केली आणि खटला नेवासे सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.

घटनाक्रम
जानेवारी 2013

- ता. 1 - सचिन घारू, संदीप थनवार, राहुल कंडारे यांचे हत्याकांड
- 9 - तिहेरी हत्यांकाडाचा "सीआयडी'मार्फत तपास करण्यासाठी मेहतर वाल्मीकी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता
- 12 - दलित व आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- 31 - रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी घटनास्थळी दिली भेट. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आणि खटला जिल्ह्याबाहेर चालविण्याची केली मागणी
फेब्रुवारी 2013
- ता. 2 - विधी व न्याय खात्याचे सदस्य सी. एस. थुल, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आर. के. मेढे यांनी भेट दिली. खटला जिल्ह्याबाहेरील न्यायालयात चालेल, असे सांगितले
- 4 - तत्कालीन रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी घटनास्थळी दिली भेट
- 6 - तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोनई तिहेरी हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी)कडे सोपविल्याची घोषणा केली
- 6 - पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सोनई येथे जाऊन हत्या झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या हत्याकांडाची
निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली
- 8 - तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली हत्या झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची भेट. गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याचे दिले होते आश्‍वासन
- 9 - तत्कालीन पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी)कडे देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मागणी करणार असल्याचे सांगितले होते
- 9 - तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांची घटनास्थळी भेट
- 24 मार्च 2013 - मृत संदीप थनवार याच्या पत्नीला समाजकल्याण विभागात सरकारी नोकरी
- 16 एप्रिल 2013 - तिहेरी हत्याकांडाची सुनावणी नाशिक किंवा जळगावला करण्याबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाची सरकारला शिफारस
- 31 ऑगस्ट 2013 - विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- 15 जानेवारी 2018 - सहा आरोपी दोषी; एकाची निर्दोष मुक्तता
- 20 जानेवारी 2018 - 6 दोषींना फाशी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा

Web Title: Marathi news Nashik news Sonai murder case verdict