ट्रेकिंग करताना पडलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात 'क्यूआरटी'ला यश

राजेंद्र बच्छाव
रविवार, 11 मार्च 2018

उंचीवरून खडकावर पडले. मात्र, सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, दोघांनाही गंभीर मार लागला. या दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले.

इंदिरानगर (नाशिक) : पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांचा तोल जाऊन सुमारे पंचवीस फूट खाली दगडावर पडल्याने जखमी झालेल्या युवक आणि युवतीला पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकाच्या (क्यूआरटी) जवानांनी अर्धा तासाच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'नंतर सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले.

आज (रविवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास पांडवलेणीच्या डोंगरावरून पायऱ्याद्वारे खाली उतरणाऱ्या नितिन देशपांडे, प्रवीण चाकोले आणि अजय जाधव यांना बचावासाठी हाक एेकू आल्याने त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तेथे त्यांना एक युवती आणि युवक जखमी झाल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. देशपांडे यांनी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांना तातडीने याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने जलद प्रतिसाद दलाला सूचना दिल्या.

मिळालेल्या सूचनानुसार इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, उपनिरीक्षक जगदीश गावित यांच्यासह बोडके पांडवलेणी येथे पोचले. वाहतूक शाखेचे अधिकारी सुरेश भालेेदेखील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने जलद प्रतिसाद पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम नलावडे आणि उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कमांडो संजय सपकाळे, सिंग, दादा वाघ, विशाल वाघ ,नवनाथ डावळे, दीपक निकम, संजय सावकार, हेमंत शर्मा आदींनी येथे पोचत न्याहळदे यांच्याकडून माहिती घेत तातडीने कारवाईला सुरवात केली. सोबत असलेल्या अत्याधुनिक साहित्याच्या आधाराने सर्वजण खाली उतरले आणि त्यांनी स्ट्रेचरद्वारे या जखमी युवतीला आणि एचएएल ओझर येथील अरविंद वैद्यनाथन या युवकाला पायऱ्यांच्या मार्गाने पायथ्याशी नेले . 

उंचीवरून खडकावर पडले. मात्र, सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, दोघांनाही गंभीर मार लागला. या दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिडको अग्निशमन दलाचे जवान आणि वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचे दयानंद कोळी प्रशांत परदेशी, आशिष शक्ती पोचले. 

दरम्यान, हे दोघे मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, रविवारी सुटीचा दिवस म्हणून ट्रेकिंगसाठी पांडवलेणीच्या डोंगरावर आले होते. मुलीचा खडकांवरून पाय सरकला आणि ती खाली पडताना तिला सावरत असताना युवकाचादेखील तोल गेला आणि दोघे खाली कोसळले. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, दोघांच्या पालकांना पोलिसांनी कळवले असून, सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .    

 

Web Title: Marathi News Nashik News Tracking Youth Collapse QTR Team Rescued them