ग्लोबल वार्मिंगमुळे सर्वांनी पाण्याची बचत करावी : चंद्रकांत विघ्ने

रोशन खैरनार
गुरुवार, 15 मार्च 2018

सटाणा एस. टी. आगार प्रशासनातर्फे बसस्थानक आवारात पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी नाईलाजास्तव महागड्या दराने पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते अथवा बसस्थानकाच्या बाहेर हॉटेलमध्ये जाऊन पाण्याची तहान भागवावी लागते.

सटाणा  : ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीवरील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून निसर्गाचे बदलते रूप हे त्याचे द्योतक आहे. पाणी हेच जीवन असल्याने प्रत्येकाने पाण्याची बचत करावी, असे आवाहन बागलाणचे सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी काल येथे केले.

येथील बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील श्री हरी ओम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आवारात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन सहाय्यक निबंधक श्री.विघ्ने यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्थेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्री.विघ्ने यांनी स्पष्ट केले.  यावेळी बोलताना पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भांगडिया म्हणाले, यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ३८ अंशांपर्यंत गेल्याने वातावरणात उष्मा वाढला असून उन्हाच्या झळांमुळे जीव कासावीस होत आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेचा फटका प्रवाशांना बसू नये म्हणून श्री हरी ओम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे राबविला जात असतो. उन्हाळ्यात बाहेरगावाहून येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना नाहक पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी आणि त्यांना दररोज थंड व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे श्री.भांगडिया यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रकाश महाजन, बच्चू सांगळे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र पवार, चंद्रकांत अहिरे, पंकज भांगडिया, चैनसुख सोनग्रा, राहुल देवरे, उमेश सोनी, अंकुश भांगडिया, अमोल अंधारे, विलास सोनवणे, राजेंद्र बडजाते, रवींद्र कापडणीस, लक्ष्मण नेरकर, दिलीप पवार, अतुल भन्साळी, यश भांगडिया आदींसह प्रवासी, आगाराचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.  

सटाणा एस. टी. आगार प्रशासनातर्फे बसस्थानक आवारात पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी नाईलाजास्तव महागड्या दराने पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते अथवा बसस्थानकाच्या बाहेर हॉटेलमध्ये जाऊन पाण्याची तहान भागवावी लागते. प्रवेशद्वारात एका सामाजिक संघटनेने काही वर्षांपूर्वी पाणपोईचे बांधकाम केले होते. कालांतराने ही पाणपोई बंद पडली. आगार प्रशासनाने ही पाणपोई दुरुस्त करून पिण्याचे शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून दिल्यास वर्षभर प्रवाशांना मोठी सोय निर्माण होईल.

Web Title: Marathi news Nashik news water problem in satana