लालफितीच्या कारभारामुळे लोकवर्गणीतून गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा

संतोष विंचू
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

“सर्वसामान्य नागरिकांची हाल थांबविण्यासाठी गावातील नागरिकांनी वर्गणी करून टँकर सुरू केला आहे. गावातील आडामध्ये हे पाणी टाकले जाते व तेथून नागरिक गरजेनुसार हे पाणी घेऊन जात आहेत.”
- कांतीलाल साळवे, संचालक,बाजार समिती

येवला : सरकारी काम म्हटले की त्यात नवलाई ठरलेलीच आहे.अशाच जिल्हाधिकाऱ्यांच्या हम करे सो कायदा या पद्धतीचा अनुभव येवलेकर घेत आहे.पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठय़ाची मागणी करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्चपर्यंत टँकर मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला दिला आहे.या लालफितीच्या कारभाराला वैतागून चांदगाव येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून मागील आठवड्यापासून गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

तालुक्यात यंदा पाणीटंचाईचे तीव्रता अल्प पावसामुळे अधिक आहे. त्यातच उत्तर पूर्व भागातील काही गावात तर डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.ज्या गावात कुठल्याही कालव्याचे पाणी नाही तसेच अर्धा तालुका टँकरमुक्त करणाऱ्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनाही ज्या गावात पोहचली नाही अश्यां गावात आज तर पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पिण्यासाठी देखील पाणी नसल्याने डिसेंबरपासून गावांतून पाणी टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत. आत्तापर्यंत कुसमाडी, आहेरवाडी, खैरगव्हांन, गोपाळवाडी, पिंपळखुटे तिसरे, चांदगाव, बाळापूर, कसारखेडे आदि दहा गावांतून टँकरने पाणीपुरवठा सुरू करून तहान भागविण्याची मागणी झाली आहे. या प्रस्तावाची दखल घेत तहसीलदार नरेशकुमार बहिरम व गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी गाव पाहणी करून हे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱयांकडे मंजुरीला देखील पाठवले आहे. मात्र जिल्हाधिकाऱयांनी हा विषय फाईल बंद ठेवला असून या संदर्भात पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना भेटले मात्र त्यांनी उघडपणे हातवर करून मार्चपर्यंत टँकर मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या लाल फितीच्या कारभारात मात्र गावोगावी पाण्यासाठीची वणवण अधिक गंभीर झाली आहे.

प्रशासनाने सोडले आता आपण गावाला वाऱ्यावर सोडायचे का? या सवालाने चांदगाव येथील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी वैयक्तिकरीत्या वर्गणी करून गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. अनकवाडे येथून भरून आणून गावातील विहिरीत रोज एक टँकर पाणी टाकले जात आहेत. दिवसभरात हे पाणी संपूर्ण गावाला पुरत नसले तरी काटकसर करून नागरिक आपली तहान भागवत आहेत.पाण्याचा असाच गंभीर प्रश्न कुसमाडी येथे असून येथे ग्रामपंचायत ग्रामनिधीतून टँकर सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.अशीच अवस्था इतर टंचाईग्रस्त गावात असून नागरिक मिळेल तेथून वाड्या वस्त्यांवरून पाणी मिळून गरज भागवत आहेत.

“सर्वसामान्य नागरिकांची हाल थांबविण्यासाठी गावातील नागरिकांनी वर्गणी करून टँकर सुरू केला आहे. गावातील आडामध्ये हे पाणी टाकले जाते व तेथून नागरिक गरजेनुसार हे पाणी घेऊन जात आहेत.”
- कांतीलाल साळवे, संचालक,बाजार समिती

“टँकरचे प्रस्ताव मंजूर नसल्याने टंचाईगस्र्त गावात हाल सुरु आहे. अशा ठिकाणी ग्रामनिधीतून तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा करता येऊ शकतो. सरपंच व ग्रामसेवकांना हा निधी खर्चाचे अधिकार आहेत.”
- सुनील अहिरे, गटविकास अधिकारी, येवला

Web Title: Marathi news Nashik news water tanker in Yeola