दुर्गा उद्यानातील गाळ्यास भाजीविक्रेत्यांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नाशिक रोड - दुर्गा उद्यानामधील गाळे घेण्यास भाजीविक्रेत्यांनी विरोध केल्याने महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयात गुरुवारी (ता. १५) दुपारी सोडत पद्धतीने गाळेवाटप झाले नाही. भाजीबाजाराच्या प्रश्‍नावर तोडगा न निघाल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. प्रशासनाने गुरुवारी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले.  

नाशिक रोड - दुर्गा उद्यानामधील गाळे घेण्यास भाजीविक्रेत्यांनी विरोध केल्याने महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयात गुरुवारी (ता. १५) दुपारी सोडत पद्धतीने गाळेवाटप झाले नाही. भाजीबाजाराच्या प्रश्‍नावर तोडगा न निघाल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. प्रशासनाने गुरुवारी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले.  

पूर्वी सिन्नर फाटा येथे भाजीबाजार भरत होता. रेल्वेपूल ओलांडून भाजी घेण्यास ग्राहकांना अडचणीचे होऊ लागले. वाढत्या लोकसंख्येमुळे भाजीबाजार कमी पडू लागला होता. नाशिक रोड येथील मुक्तिधाम रोड, जुन्या देना बॅंकेशेजारी रस्त्यावर काही भाजीविक्रेते बसू लागले; परंतु रस्त्यावर वर्दळ वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. रस्त्यावर अग्निशमन दलाचे बंब व रुग्णवाहिका जाण्यास अडचण निर्माण होऊ लागल्याने १९९६ मध्ये महापालिकेने येथील भाजीविक्रेत्यांना दुर्गा उद्यानाच्या जागेत स्थलांतरित केले होते. तेथे चांगल्याप्रकारे भाजीबाजार भरत होता. जवाहर मार्केटमधील महापालिकेची प्रशासकीय इमारत कामकाजासाठी कमी पडू लागल्याने सर्व खाती एकाच इमारतीत असावीत, अशी नागरिकांची मागणी होती. त्यामुळे महापालिकेने दुर्गा उद्यान येथील जागेवर प्रशासकीय इमारत बांधण्यास मंजूर केले. त्यानुसार भाजीविक्रेत्यांना इमारतीच्या मागील बाजूस जागा दिली; परंतु या भाजीबाजारात येण्यास रस्ता नसल्याने ग्राहक बाजारात येत नव्हते. भाजीमालाला ग्राहक नसल्याने विक्रेते सुंदरम कॉम्प्लेक्‍स, शिवाजी चौक, बिटको हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर बसू लागले. महापालिकेने प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबरोबर दुर्गा उद्यानामधील इमारतीमागे भाजीविक्रेत्यांना पत्र्याचे शेड, ओटा या पद्धतीने गाळे तयार केले. २००८-०९ दरम्यान भाजीविक्रेत्यांना सोडत पद्धतीने गाळेवाटप केले. सुभाष रोड, बिटको हॉस्पिटलशेजारून आणि प्रशाकीय इमारतीशेजारून भाजीबाजारात येण्यासाठी चारही बाजूने रस्ता करून द्यावा, अशी मागणी होती. पण सुभाष रोड व बिटको हॉस्पिटलच्या बाजूने रस्ता उपलब्ध झाला नाही. सध्या असलेला रस्ता अरुंद व अडचणीचा असल्याने ग्राहक भाजी घेण्यास बाजारात येत नाहीत. त्यामुळे विक्रेते रस्त्यावर बसू लागले. नंतर सुंदरम कॉम्प्लेक्‍समधील रहिवाशांचा भाजीबाजाराला विरोध होऊ लागल्याने विक्रेते वि. दा. सावरकर उड्डाणपुलाखाली बिटको चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत बसू लागले. 

‘विक्रेत्यांना विश्‍वासात घ्यावे’
दुर्गा उद्यान जागेत आठ बाय पाचचे दोनशे गाळे आहेत. महापालिकेने आकार कमी करून साडेचार बाय पाचचे दोनशे ते अडीचशे गाळे तयार केले आहेत. हे लहान असून, भाजीपाल्याच्या तीन पाट्याही या जागेवर ठेवता येणार नाहीत. विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने सोडत पद्धतीने फक्त दोनशे ते अडीचशे विक्रेत्यांना जागा मिळेल. उर्वरित विक्रेत्यांचे काय? ते पुन्हा रस्त्यावर बसले तर उद्यानातील गाळ्यांमध्ये ग्राहक येणार नाहीत. महापालिकेने सर्व नवीन-जुन्या विक्रेत्यांना विश्‍वासात घेऊन गाळ्यांचे वाटप करावे, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

Web Title: marathi news nashik Vegetable vendors