जलयुक्तचे अपयश झाकण्यासाठी येवलेकरांचा पाण्यासाठी छळ

संतोष विंचू
गुरुवार, 15 मार्च 2018

"पालखेडच्या लाभ क्षेत्रातील गावात सध्या तरी पाणी आहे मात्र उत्तरपूर्व भागात अल्प पावसामुळे स्थिती भयावह झाली आहे.यामुळे नागरिकांची भटकंती सुरू असल्याने वेळेत टँकर मिळावे अशी आमची मागणी आहे.दुष्काळी गावांच्या नागरिकांसह महिलांची होणार यातील दिवसांत पाण्याची भटकंती थांबविण्यासाठी प्रशासनाने आलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत अशी मागणी आम्ही केली आहे"
- आशा साळवे, सभापती, येवला

येवला : अल्प पावसामुळे पाणवठे आटल्याने डिसेंबरमध्येच गावोगावी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. त्यासाठी रितसर प्रस्तावही पाठविण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मार्चपर्यंत येवल्याला टँकर न देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे गेले तीन महिने आठ दहा गावांत नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती झाली.

जलयुक्त शिवार योजनेचे अपयश दिसून येईल म्हणून टँकर सुरू न केल्याचे बोलले जात आहे.मात्र या एका कारणासाठी हजारो नागरिकांचा तीन महिने पाण्यासाठी छळ झाला. जिल्हाधिकाऱयांनी आपला शब्द खरा ठरवत अडीच-तीन महिन्यांनी टँकरला मंजुरी दिली खरी मात्र तीही अपुरीच असल्याने अजूनही गावोगावी पाण्यासाठी हाल सुरूच आहे.

तालुक्यात यंदाही वरुणराजा कमी प्रमाणावर कोसळल्याने तालुक्याच्या उत्तर -पूर्व गावांना डिसेम्बर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.पंचायत समिती सभापतींसह लोकप्रतिनिधींनी डिसेम्बर महिन्यापासून पाणी ट्रॅकरसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तगादा लावूनही १२ मार्चपावेतो केवळ २ ट्रॅकर देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी येवलेकरांची यंदा बोलळवनच केली आहे.यामुळे  टंचाईग्रस्त गावांमध्ये सध्या तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

डिसेंबर व जानेवारी महिन्यात आहेरवाडी,कुसमडी ,खैरगव्हान, गोपालवाडी (खैरगव्हान) ,चांदगाव ,कासारखेडे ,बाळापूर ,पिंपळखुते तिसरे या ८ गावांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले.३ मार्च रोजी म्हणजे अडीच महिन्यानंतर या आठ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरणा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. ४ टँकर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही  दोन टँकर पंचायत समितीच्या सद्या प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचायत समितीच्या मिळालेल्या २ टँकरकडून दररोज ७ खेपा मंजूर झालेल्या ८ गावांना केल्या जात आहेत. आणखी एक टँकर समितीला प्राप्त झालेला असून या टँकरच्या बॅटरी निकाम्या झालेल्या असल्याने तो सद्या उभाच आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बॅटरी चार्जिंग करून तो आला ,मात्र येथे येताच तो पुन्हा सुरू होऊ शकलेला नाही.

ममदापुर  गावाचा २९ जानेवारी रोजी,गुजरखेडा गावाचा ९ फेब्रुवारी , कोळगाव व वाईबोठी, या दोन गावांचे प्रस्ताव २५ फेब्रुवारी रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल झालेले आहेत तर पन्हाळसाठे आणि लहीत गावांचे प्रस्ताव ६ मार्च रोजी पाहणीसाठी दाखल झाले असून या गावांची पाहणी अजून होणे बाकी आहे. बलेगाव ,वडगाव ,चिचोंडी खुर्द या गावांना प्रशासनाने बोअरवेल्स मंजूर केलेले आहेत.

डिसेंबर महिन्यापासून ८ गावे तहानलेली असताना मार्च महिन्यात २ टँकर देणाऱ्या प्रशासनाची तारांबळ स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे.जिल्हाधिकारी पहिल्यापासूनच टँकर न देन्य‌ाच्या भुमिकेत असल्याने पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्या शिष्टमंडलासह माजी सभापती संभाजी पवार,कांतीलाल साळवे आदींना पाणी टँकर संदर्भात डिसेम्बर महिन्यात माघारी पाठविले होते.यानंतर शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे ,सभापती आशा साळवे , तालुकाप्रमुख झुंझार देशमुख, जिल्हा परिषद सदस्य  सविता पवार ,सुरेखा दराडे, यांच्यासह पदाधिकारीही जिल्हाधिकाऱ्यांना भेटले ,मात्र पाणी टँकर देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचे दिसून आले.पिण्याच्या पाण्यासाठी उत्तर -पूर्व भागातील गावे टाहो फोडत असताना जिल्हाधिकारी कार्यालय मात्र डोळ्यावर पांघरून घालून बसल्याचेच दिसत आहे. एकीकडे विहिरींनी तळ गाठलेला आहे.पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झालेली आहे.

८ गावांची तहान भागविताना दमछाक होत असताना गेल्या २ दिवसांपासून स्थानिक पातळीवर आणखी ६ गावांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राजापुरच्या महिलांनीही आता पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे . येत्या महिनाअखेर टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
नव्याने १० गावांचे प्रस्ताव पंचायत समितीच्या आणखी १० गावांचे प्रस्ताव गेल्या ५ दिवसात प्राप्त झाले आहेत.पांजरवाडी ,गारखेडा , रेंडाळे ,आडसुरेगाव ,खिरडीसाठे ,अनकाई ,गोरखनगर, वसंतन ,शिवाजीनगर (तळवाडे),कौतखेडे या गावानाही पिण्याच्या पाण्याची तहान लागली आहे.एकूण आता २४ गावे तालुक्यात टंचाईग्रस्त झाल्याने मार्च महिन्यातच मोठे आव्हान उभे राहिले आहे.

" पालखेडच्या लाभ क्षेत्रातील गावात सध्या तरी पाणी आहे मात्र उत्तरपूर्व भागात अल्प पावसामुळे स्थिती भयावह झाली आहे.यामुळे नागरिकांची भटकंती सुरू असल्याने वेळेत टँकर मिळावे अशी आमची मागणी आहे.दुष्काळी गावांच्या नागरिकांसह महिलांची होणार यातील दिवसांत पाण्याची भटकंती थांबविण्यासाठी प्रशासनाने आलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत अशी मागणी आम्ही केली आहे"
- आशा साळवे, सभापती, येवला

Web Title: Marathi news Nashik water problem in Yeola