गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

कळवण देवळा परिसरात गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कळवण परिसरात मोठ्या प्रमाणावर हरियाना पंजाब या परिसरातून हे यंत्र दाखल झाली आहेत.

खामखेडा (नाशिक) - सध्या सर्वत्र रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू झाली आहे. कसमादे परिसरात गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची गहू मळणीची लगबग सुरू झाली आहे. कळवण देवळा परिसरात गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कळवण परिसरात मोठ्या प्रमाणावर हरियाना पंजाब या परिसरातून हे यंत्र दाखल झाली आहेत.

पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता गव्हाची लवकर मळणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसून येत आहे. पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरीता लागणारा वेळ पाहता या हार्वेस्ट मशीनने ते केवळ तासाभरात होऊ लागल्याने यांत्रिकी कर्णास शेतकरी पसंती देऊ लागला आहे.

हार्वेस्टर मुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीतकमी वेळात पिकांची मळणी करुन घरी धान्य आणण्याच्या गडबडीत आहेत.या मशीनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाल्याने शेतकरी या यंत्राच्या सहाय्यानेच गहु काढत आहे.

एक एकराचे काम अर्धा तासात
मजुरांचा वाढता तुटवडा, तसेच वाढलेली मजुरी पाहता शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीनने  मळणी करणे अधिक सोयीचे वाटते.पारंपरिक पध्दतीने गहु काढावयाचा म्हटला तर एका एकराला दहा ते बारा महिला मजूर व चार हजारापर्यंत मजुरी लागते.

त्यात हा गहू मळणीकरीता लागणारे मजुरांची मजुरी वेगळीच असते.परंतु गहु काढण्याच्या या हार्वेस्ट मशीनमुळे एकरी बावीसशे रुपये दर देऊन एक एकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्धा तासात काढून होतो. शेतकऱ्याला ह्या यंत्राच्या मदतीने केलेले कामामुळे कमी वेळात काम होत असल्याने यास मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे.

 

Web Title: marathi news nasik agriculture harvest machine wheat