पंधरा दिवसांवर होता मुलीचा विवाह; तत्‍पुर्वीच दुःखाचा डोंगर, वडिलांनी फोडला हंबरडा

विनायक सुर्यवंशी | Thursday, 5 November 2020

बहिणीच्या विवाह सोहळ्याची तयारी आणि नवीन घराचे स्‍वप्न पुर्ण होत असताना घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्‍या पंधरा दिवसांवर बहिणीचे लग्‍न असल्‍याने यात वरघोडा म्‍हणून मिरण्याची हौस देखील अपुर्ण राहिली. बहिणीला देखील हा मोठा धक्‍का होता; तर घरातील एकुलता एक मुलगा गेल्‍याने वडिलांचा देखील आक्रोश न पाहवणारा होता.

नवापूर (नंदुरबार) : मोठ्या बहिणीचा विवाह अवघ्‍या पंधरा दिवसांवर आला होता. त्‍याची तयारी सुरू असल्‍याने घरात आनंदी वातावरण होते. बहिणीच्या लग्‍ना सुक्‍या (वरघोडा) होवून मिरण्याची हौस हेाती. ती देखील अपुर्ण राहिली. सारे आनंदाचे वातावरण असताना संपुर्ण घर दुःखात बुडाले आणि वडिलांनी देखील एकच हंबरडा फोडला.

शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारा भावेश विजय पाटील (वय १९) या युवकाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ४) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. इंदिरानगरातील सप्तशृंगी मंदिरासमोरील विजय पाटील यांचे घर दुरूस्तीचे काम सुरू होते. त्या ठिकाणी त्यांचा मुलगा बांधकामावर पाणी मारत असताना अचानक विजेचा शॉक लागला. त्यावेळेस बहिणीने प्लास्टिकची खुर्ची मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वडिलांचा आक्रोश
माझा एकुलता-एक तरुण मुलगा गेला, आमच्या जगण्याची उमेद आज संपली, सर्व स्वप्नांची राखरांगोळी झाली, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले, आता जागून काय करू असा हंबरडा शॉक लागून मृत्यू झालेल्या भावेश च्या वडिलांनी फोडल्याने उपस्थितांना ही अश्रू अनावर झाले.

Advertising
Advertising

डॉक्‍टर होण्याचे होते स्‍वप्न
भावेश पाटीलने नुकतीच नीटची परिक्षा दिली होती. त्यांचे स्वप्न होते डॉक्टर होण्याचे; परंतू काळाने घाला घातल्यामुळे त्याचे व आई-वडीलांचे स्वप्न अपूर्ण राहिले. विजय पाटील यांचा एकुलता एक मुलगा गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच नवापूर शहरातील नागरिकांनी भावेश यास खासगी रूग्‍णालयात नेले. दरम्यान डॉक्टरांनी त्‍यास मृत घोषित केले. वडील विजय पाटील यांनी रूग्णालयात हंबरडा फोडत आक्रोश केला. 

१९ नोव्हेंबरला विवाह
भावेश पाटील यास दोन बहिणी आहेत. मोठी बहिण भाविका पाटील यांचे १९ नोव्हेंबरला लग्न होते. त्याआधीच हि दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान मयत भावेश पाटीलवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. 

घटनेची पूर्णावृत्ती 
तीन वर्षांपूर्वी याच परिसरात याच दिवशी (ता .४ नोव्हेंबर २०१७) घराचे नवीन बांधकामाला पाणी मारत असतांना वैभव प्रमोद पाठक या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. कालच्या भावेश सोबत घडलेल्या घटनेमुळे याची आठवण झाली.

संपादन ः राजेश सोनवणे