एकमेव इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा; नंदुरबारला स्‍थलांतरणाला विरोध

विनायक सुर्यवंशी
Sunday, 13 December 2020

नवापूर येथील इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा नंदुरबारला स्थलांतरित होणार आहे. या संदर्भात पालकांची बाजू मांडताना सांगितले, की नवापूर तालुका अतिदुर्गम भागात आहे. शाळेची स्थापना २००४ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत शाळा सुरळीतपणे सुरू आहे.

नवापूर (नंदुरबार) : तालुक्यातील एकमेव शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा ही नवापूर या ठिकाणीच सुरू ठेवावी. नंदुरबारला स्थलांतरित करू नये, या आश्रमशाळेसाठी नवापूरला जिल्हाधिकाऱ्यांनी जागा मंजूर करून दिली आहे. बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे शाळा समिती प्रस्ताव देणार आहे. शाळेचे स्थलांतर करू नये, अशी बाजू पालकांनी बैठकीत मांडली. 
नवापूर शहरातील आदर्शनगर येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत पालक मेळावा झाला. शालेय समितीचे अध्यक्ष चंदू गावित, पालिका गटनेता आशिष मावची, आर. सी. गावित, विस्ताराधिकारी पी. एम. वसावे, मुख्याध्यापक के. आर. गावित यांच्या हस्ते देवमोगरा व सरस्वती मातेच्या प्रतिमापूजनाने उद्‌घाटन झाले. 

२००४ पासून शाळा
नवापूर येथील इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा नंदुरबारला स्थलांतरित होणार आहे. या संदर्भात पालकांची बाजू मांडताना सांगितले, की नवापूर तालुका अतिदुर्गम भागात आहे. शाळेची स्थापना २००४ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत शाळा सुरळीतपणे सुरू आहे. परंतु २०१८ मध्ये शाळेच्या इमारतीमुळे नंदुरबार येथे स्थलांतर करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. परंतु त्या वेळी पालकांनी, तालुका लोकप्रतिनिधी व आदिवासीच्या विविध संघटनांनी स्थलांतराला विरोध दर्शविला. त्यामुळे शाळा नवापूर या ठिकाणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु २०२० मध्ये शासनाने शाळा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता व पालक मेळावा न घेता परस्पर शाळा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. तो अंत्यत चुकीचा व अन्यायकारक आहे. 

एकमेव इंग्रजी शाळा
नवापूर तालुक्यातील एकमेव शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा ही नवापूर या ठिकाणी सुरू ठेवावी, ती नंदुरबारला स्थलांतरित करू नये. या आश्रमशाळेसाठी नवापूर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा मंजूर करून दिली आहे. बांधकामासाठी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शाळा समितीने तयार करावा, अशी सूचना आर. सी. गावित यांनी केली. नवापूर येथील इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळा ही स्थलांतरित होऊ देणार नाही. नवापूर या ठिकाणी शाळेच्या इमारतीची व्यवस्था करण्यासाठी आम्ही मदत करू, असे सांगितले. शालेय समितीचे अध्यक्ष चंदू गावित, गटनेता आशिष मावची यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी हात वर करून इंग्रजी माध्यमिक शासकीय आश्रमशाळा स्थलांतरित होऊ नये म्हणून एकमताने ठराव करण्यात आला. मुख्याध्यापक गावित यांनी प्रास्ताविक केले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur english medium school shift nandurbar