निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या जमिनीवरील "इनाम' शब्द गायब 

live
live

नाशिक ः श्री संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशीची मागणी विश्‍वस्तांनी केली आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. "इनाम' शब्द हटवून देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीची मोडस ऑपरेंडीची चौकशी करण्याची मागणी विश्‍वस्तांनी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे. 


वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. निवृत्तिनाथांचे त्र्यंबकेश्‍वरला समाधिस्थळ असून, राज्य व देशभरातील भाविक नाथांच्या समाधिस्थळाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रातील वारकरी मंडळींचे अस्मितेचे प्रतीक असलेल्या या श्री संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या जागेच्या मालकीसह खरेदी-विक्रीचा व्यवहार चर्चेत आला आहे. देवस्थानच्या इनाम जमिनीपैकी काही जमीन परस्पर विक्रीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा देवस्थानच्या विश्‍वस्तांना संशय आहे. देवस्थानचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, विश्‍वस्त पुंडलिकराव थेटे, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे, पंडित कोऱ्हे, रामभाऊ मुळाणे यांसह काही वारकरी मंडळींनी याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हरकत नोंदवली आहे. 

संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या इनाम जमिनीवर गाव नमुना 3 च्या नकलेत देवस्थान इनाम जमिनीची नोंद आहे. मात्र, 2012 मध्ये तहसील कार्यालयाने इनाम शब्द रद्द करून भोगवटदार-1 अशी नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. "इनाम' शब्द रद्द कसा झाला?, याच्या चौकशीची गरज आहे. संबंधित देवस्थानच्या जमिनीच्या नोंदीबाबत खातरजमा करून संबंधितांना गैरव्यवहारापासून रोखावे, अशी मागणी आहे. त्यासाठी सोमवारी (ता. 2) निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देत तशी मागणी केली आहे. 

काय आहे प्रकरण 
त्र्यंबकेश्‍वरला 2012 मध्ये तत्कालीन तहसीलदारांसह महसूल अधिकाऱ्यांनी काही देवस्थानच्या जमिनीचा "इनाम' शब्द परस्पर काढून गैरव्यवहार केला. तत्कालीन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी चौकशी करीत संबंधितांवर काही प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. नेमके याच काळात निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या जमिनीवरील "इनाम' शब्द काढला गेला होता. सध्या तोच आधार घेत, त्याच मोडस ऑपरेंडीनुसार निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचा घाट घातला जात असल्याचे देवस्थान विश्‍वस्तांच्या लक्षात आले. त्यामुळे देवस्थानच्या जमिनीचा इनाम शब्द कसा काढला, याच्या चौकशीची मागणी विश्‍वस्तांनी केली आहे. 

संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या जमिनीवरील "इनाम' शब्द कसा काढला गेला, याची चौकशी करण्यासाठी देवस्थानच्या विश्‍वस्तांचे निवेदन आले आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. 
- भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com