दहिवदच्या सरपंचांकडे आढळली बनावट शिधापत्रिका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या दहिवद येथील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत चौकशी सुरु आहे. त्यात चक्क सरपंच असलेल्या सोनी नाना माळे यांच्याकडे बनावट शिधापत्रिका असल्याचे चौकशी अंती उघड झाले आहे. 

अमळनेर - दहिवद (ता. अमळनेर) येथील सरपंचांकडे बनावट शिधापत्रिका आढळली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश तहसीलदार प्रदीप पाटील यांनी नुकतेच पुरवठा निरीक्षक आर. पी. साळुंखे यांना दिले आहेत. यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या दहिवद येथील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत चौकशी सुरु आहे. त्यात चक्क सरपंच असलेल्या सोनी नाना माळे यांच्याकडे बनावट शिधापत्रिका असल्याचे चौकशी अंती उघड झाले आहे. 

तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की तक्रारदार शिवाजी सुकलाल पारधी यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पत्रानुसार 26 ऑगस्ट 2013 व 28 जून 2013 या संदर्भानुसार शिवाजी पारधी यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सरपंच सोनी नाना माळे यांच्याकडे असलेली शिधापत्रिका (वायएच क्र. 1146402) कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी केली असता सरपंच माळे यांनी दिलेल्या जबाबात माझे नाव वडील नाना काशिनाथ माळे यांच्या शिधापत्रिकेत असल्याचे मान्य केले. सोनी नाना माळे ही शिधापत्रिका माझीच असून, माझ्या नावाने असलेल्या कार्डवर मला गॅस कनेक्‍शन घेण्यासाठी स्वतंत्र कार्डाची गरज होती. याबाबत मी कोणताही अर्ज केलेला नाही. त्यासाठी ही शिधापत्रिका मला कोणी दिली आठवत नाही. मात्र, माझे सासरे धरणगाव तालुक्‍यातील हिंगोणे बुद्रुक येथील रहिवासी आहेत. माझे आणि पतीचे दोन वेगवेगळ्या शिधापत्रिकेत दोन ठिकाणी नाव असल्याचेही त्यांनी मान्य केले. ते मुळ कार्ड रद्द करावे मी तहसील कार्यालयात जमा करीन असा जबाब त्यांनी दिला होता. त्यामुळे ही शिधापत्रिका त्यांचीच असल्याचे मान्य केले असून, यासाठी त्यांनी अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्यांनी गैरप्रकाराने शिधापत्रिका हस्तगत केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वरील शासन निर्णयाप्रमाणे आवश्‍यक ती फौजदारी स्वरुपाची कारवाई करून सदर अहवाल कार्यालयास पाठवावा, असे आदेश पुरवठा निरीक्षक आर. पी. साळुंखे यांना दिल्याचेही यात म्हटले आहे. 

Web Title: marathi news north maharashtra duplicate ration card sarpanch