किर्तन सेवेसाठी लाभतात मुस्लिम बांधवाचे हात 

दीपक कच्छवा 
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुस्लिम असतानाही हिंदू धर्मियांच्या अंत्यसंस्कारात सहभाग घेणे, मंदिरांच्या बांधकामांसाठी देणगी देणे एवढेच नव्हे तर गावात कीर्तनाची सेवा करणे यासाठी ते नेहमीच सरसावलेले असतात. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - राष्ट्रीय एकात्मतेचे व्यासपीठावरून गोडवे गाण्यापेक्षा आपल्या कृतीतून धर्म आणि जातीभेद मिटविण्याचे काम करणाऱ्या वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील सरदार पठाण यांचे कार्य आदर्शवत ठरले आहे. स्वतः मुस्लिम असतानाही हिंदू धर्मियांच्या अंत्यसंस्कारात सहभाग घेणे, मंदिरांच्या बांधकामांसाठी देणगी देणे एवढेच नव्हे तर गावात किर्तनाची सेवा करणे यासाठी ते नेहमीच सरसावलेले असतात. 

वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे श्री संत प्रेममुर्ती मीराबाई पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. यंदाचे दुसरे वर्ष असून यानिमित्ताने चार दिवस किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मुस्लिम समाजातील सरदार भिकारी पठाण यांनी यासाठी वारकरी धर्म प्रचारक ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर यांचे 18 मार्चला एका रात्रीची किर्तनाची सेवा स्विकारली आहे. त्यासाठी त्यांनी मोबदला म्हणून 5 हजार 100 रुपये देणगी रूपाने दिले आहेत. या कार्यक्रमात सरदार पठाण यांनी स्वतःहून पुढे येत गावात जातीय सलोख्यातून एकात्मतेचे दर्शन घडविले आहे. 'अशी कामे करताना मला खूप आनंद होतो. 'राम' व 'रहिम' एकच आहे. त्यामुळे असे मतभेद विसरून गावात एकोप्याने काम करावे,' असे मत सरदार पठाण यांनी व्यक्त केले.  

मंदिरासाठी देणगी 
वरखेडे गावातील चौकात साईबाबांबाचे भव्य अशा मंदिराचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. या मंदिराच्या कामाला कुठलाही संकोच न बाळगता, पठाण कुटुंबीयांनी पाच हजार रुपये देणगी दिली. येथून जवळ असलेल्या टेकडे वस्तीवरील हनुमान मंदिराचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी देखील या कुटुंबाने एक हजाराची मदत केली. त्यामुळे मंदिराच्या कामांना सरदार पठाण यांनी देणग्या दिल्याने त्यांचे हे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. मंदिरांच्या देणग्यांव्यतिरिक्त सरदार पठाण याने घरी गुरे देखील ठेवली आहेत. हिंदू धर्मीयांचे दैवत असलेल्या गाईची ते मनोभावे सेवा करतात. गावात कुठलीही दुःखद घटना घडल्यानंतर सरदार पठाण जातीने उपस्थित राहतात. त्यामुळे पठाण कुटंबीय परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. 

अंत्यविधीसाठी पुढाकार 
वरखेडे येथे विविध जाती धर्माचे लोक राहतात. येथील कच्छवा परिवारातील मृत झालेल्या व्यक्तीला जमिनीत पुरण्याची प्रथा आहे. अशावेळी सरदार पठाण हे स्वतः हातात फावडा घेऊन खड्ड्यात उतरतात व मृतदेह उचलण्यापासून ते त्याला खड्ड्यात ठेवून त्यात हातात फावडा घेऊन माती टाकण्याचे काम ते करतात. एखाद्या हिंदू धर्मियांच्या अंत्यविधीसाठी जातीने मुस्लिम असलेल्या माणसाकडून अशी सेवा होणे हे या भागातील एकमेव उदाहरण ठरले आहे. सरदार पठाण यांच्यासह गावातील कोणत्याही मुस्लिम बांधवाकडे कुठलाही कार्यक्रम असला तरी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे गावात हिंदू- मुस्लिम ऐक्‍य दिसून येते. 

Web Title: marathi news north maharashtra hindu muslim temple kirtan sardar pathan