चार तासांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाला रस्त्यावर सोडून आई फरार

दीपक खैरनार
बुधवार, 10 जानेवारी 2018

अंबासन (ता. बागलाण) : बागलाण तालुक्यातील देवळाणे-कर्र्हे रस्त्यावरील इच्छामणी गणपती मंदिराजवळ चार तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात पुरूष जातीचे जिवंत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी तात्काळ जायखेडा पोलिस ठाण्याच्या मदतीने नवजात बालकाला सटाणा येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने अर्भकास वाचविण्यासाठी यश आले आहे. जायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देवळाणे-कर्र्हे रस्त्यावर इच्छामणी गणपती मंदिराजवळ युवराज श्रावण काकुळते यांची शेती आहे. संबंधित शेतकरी रात्री आपल्या शेतातील पिकांना पाणी देत होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास विद्युत पंप बंद करून शेतातील घराकडे जात असताना त्यांच्याच शेतात जनावरांसाठी रचून ठेवलेल्या चाऱ्याजवळून बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने ते घाबरले त्यांनी घरी येऊन कुटुंबियांना माहीती कळविली व गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष भदाण यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. तसेच पोलिस पाटील अशोक आहिरे यांनाही कळविले त्यांनी लागलीच जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहीती दिली. 

पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार जगन्नाथ महाजन, त्र्यंबक पवार आणि आण्णा शेवाळे हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी नागरिकांच्या मदतीने बालकाला सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात बालरोगतज्ञ नसल्याने स्थानिक बालरोगतज्ज्ञ अमोल पवार यांना बोलवण्यात आले. नवजात बालक चार तासांपूर्वी जन्मलेले असल्याचे यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हुसेन नयनी यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयातील प्रवीण देवरे, महेंद्र रौंदळ यांनी मोठे सहकार्य केले. नवजात बालकाला त्वरीत एलआयसीयू मध्ये दाखल करून रक्ताने व मातीने माखलेले संपूर्ण शरीर स्वच्छ केले. कुडकुडत्या थंडीत गारठल्याने त्याची संपूर्ण निगा घेतली गेली. ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्याने पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे डॉ. हुसेन नयनी यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. जायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड करीत आहेत.  

Web Title: Marathi news north maharashtra news new born baby leave alone by her mother