पोलिसांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी रोटरी क्लबचे प्रयत्न

HealthCheckup
HealthCheckup

सटाणा : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्यानुसार पोलीस सर्वसामान्यांचे रक्षण करण्यास सतर्क असतात. मात्र त्यांच्या आरोग्याच्या रक्षणाबाबत सगळीकडे उदासीनता दिसून येते. पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले तर ते गुन्हेगारीमुक्त समाज घडवू शकतात, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ.प्रकाश जगताप यांनी आज शुक्रवारी (ता. 16) येथे केले.

येथील यशोधन हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे शहर व तालुक्यातील पोलीस बांधवांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ.जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, जायखेड्याचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट, अजय बुवा आदी उपस्थित होते.

नेहमी बदलणारी ड्युटी, कामाचा ताण यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कमी वयातही पोलिसांना अनेक विकार जडलेले दिसून येतात. त्याचा परिणाम गुन्हे रोखणे किंवा तपासकामावर होऊ शकतो. या शिबिराच्या माध्यमातून पोलीसांच्या शारीरिक तपासण्या केल्या जाणार आहे. रोटरीतर्फे लवकरच पोलिसांच्या कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबीर घेणार असल्याचे रोटरीचे सचिव प्रदीप बच्छाव यांनी स्पष्ट केले.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हृदयरोग, अस्थीरोग, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी, मेंदूचे ताणतणाव, दमा, सांधेचे विकार, डब्ल्यू. एच. रेशो, डोळ्याची व्याधी, कान, नाक, घसा, जुने सर्दीचे आजार, खोकला, बीएमआय इंडेक्स व रक्तगट अशा विविध शारीरिक चाचण्या करण्यात आल्या. या तपासणीनंतर पोलिसांना गंभीर आजार आढळल्यास त्यांच्यावर रोटरीतर्फे मोफत इलाज करण्यात येणार आहे. दिवसभरात सटाणा व जायखेडा पोलीस स्टेशनच्या ६० हून अधिक पोलिसांनी या शिबिरात सहभाग घेतला. शिबिरात अस्थिरोगतज्ञ डॉ.मनोज शिंदे, डॉ.संदीप ठाकरे, डॉ.सुदर्शन अहिरे, डॉ.उमेश बिरारी आदी डॉक्टरांनी मोफत तपासण्या केल्या.

कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष उमेश बिरारी, सचिव प्रदीप बच्छाव, डॉ.अमोल पवार, योगेश अहिरे, रामदास पाटील, अभिजित सोनवणे, डॉ. साहेबराव अहिरे, डॉ.अंजली जगताप, प्रा.शांताराम गुंजाळ, प्रा.बी.डी.बोरसे, बी.के.पाटील, मनोज जाधव, प्रल्हाद सोनवणे, पुंडलिक डंबाळे आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com