शॉर्टसर्किटमुळे 3 एकर डाळिंब बाग जळून भस्मसात

रोशन खैरनार
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथील शेतातून गेलेल्या विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे काल सोमवारी (ता.२६) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत माजी सरपंच लताबाई वसंत शेवाळे व भास्कर रतन शेवाळे यांच्या ३ एकर क्षेत्रावरील डाळिंब बाग पूर्णपणे जळून भस्मसात झाल्याने आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथील शेतातून गेलेल्या विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे काल सोमवारी (ता.२६) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत माजी सरपंच लताबाई वसंत शेवाळे व भास्कर रतन शेवाळे यांच्या ३ एकर क्षेत्रावरील डाळिंब बाग पूर्णपणे जळून भस्मसात झाल्याने आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आज सकाळी महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. मात्र डाळिंब बागेतील सर्व १६०० झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेवाळे कुटुंबियांचे होत्याचे नव्हते झाले असून शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांनी चौगाव परिसरात भीमदरा शिवारातील बंद्या डोंगरालगत खडकाळ जमिनीवर गेल्या दीड वर्षांपूर्वी सपाटीकरण करून डाळींब बागेची लागवड केली होती. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून बेमोसमी पाऊस, गारपीट व बदलत्या तापमानामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पतीचे निधन झाले असताना माजी सरपंच लताबाई शेवाळे यांनी आपले सोने गहाण ठेऊन सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या पैशांवर त्यांनी शेतात विहिरीचे खोदकाम करून डाळिंब बाग उभारली.

अत्यल्प पावसामुळे बागेस पाणी देणे शक्य व्हावे यासाठी त्यांनी वेळप्रसंगी व्याजाने पैसे उचलले व टँकरने पाणी विकत घेऊन डाळिंब बाग जगविली. दीड वर्षांनंतर आज बहार धरण्याची वेळ आली असताना कष्टांना फळ मिळेल या अपेक्षेत शेवाळे कुटुंबीय होते. काल सोमवारी (ता.२६) श्रीमती शेवाळे यांच्या नातवंडांची तब्येत बरी नसल्याने त्यांना कळवण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रीमती शेवाळे त्यांच्यासोबत रुग्णालयातच होत्या.  

याचवेळी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारांमध्ये अचानक घर्षण झाल्याने ठिणग्या उडाल्या व त्या खाली असलेल्या डाळिंब बागेवर पडल्या. त्यामुळे संपूर्ण बागेने क्षणात पेट घेतला. यावेळी शेतात असलेले भास्कर शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, या आगीत हात व पायाला गंभीर जखमा झाल्या असतानाही त्यांनी आरोळ्या मारून परिसरातील इतर शेतकऱ्यांना बोलाविण्याचा आटापिटा केला. मात्र सोसाट्याचा वारा व आगीच्या रौद्ररूपामुळे ३ एकर क्षेत्रावरील संपूर्ण बाग भस्मसात झाली. या आगीत शेवाळे यांच्या १६०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर मशीन), फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युत पेटी, वायर या सर्व गोष्टी जळून खाक झाल्या. दरम्यान, आज मंगळवार (ता.२७) रोजी सकाळी तलाठी वाय.जी.पठाण, कृषी सहाय्यक एस.के.पाटील, ग्रामसेवक आर.एच.शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

तालुक्याच्या महसूल, वीज महावितरण व कृषी विभागाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी आणि शेवाळे कुटुंबियांना नुकसानभरपाई देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बागलाण विकास मंचचे समन्वयक नंदकिशोर शेवाळे, दादाजी शेवाळे, दीपक शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बबन गांगुर्डे, दगा गांगुर्डे, रोशन शेवाळे, सुनील जगताप आदींनी केली आहे.

वर्षभरापूर्वी पती वसंत शेवाळे यांचे निधन झाल्यानंतर सोने गहाण ठेऊन बँकेकडून कर्ज घेतले होते. आपल्या दीड एकरावर डाळिंब बाग घ्यावी, कुटुंब व मुलांचे भविष्य घडवावे आणि कर्ज फेडायचे अशी इच्छा होती. मात्र आगीने होत्याचे नव्हते झाल्याने आता कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदत करावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असे नुकसानग्रस्त शेतकरी लताबाई वसंत शेवाळे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news north maharashtra news pomegranate farm fire