भुजबळांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला बळ देणार हल्लाबोल

संतोष विंचू
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

येवला : सन 20014 पासून येवला म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे येवला असे समीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येथील आमदार झाल्याने जिल्ह्यात बनले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून भुजबळ अडचणीत आल्याने येथील राष्ट्रवादी काहीशी सुनी झाली आहे. त्यातच मध्यंतरीच्या निवडणुकातही याचे प्रतिबिंब दिसून आले मात्र आता पक्षाचे सर्वच प्रमुख नेते हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने येथे येत असून येथील सगळी राष्ट्रवादीच तयारीला लागली आहे. यामुळे हल्लाबोलच्या निमित्ताने स्थानिक राजकारणाची मैफिल बहरणार अन् एनर्जी देणारा बूस्टर डोस मिळण्याचा आशावाद आहे.

येवला : सन 20014 पासून येवला म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे येवला असे समीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येथील आमदार झाल्याने जिल्ह्यात बनले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून भुजबळ अडचणीत आल्याने येथील राष्ट्रवादी काहीशी सुनी झाली आहे. त्यातच मध्यंतरीच्या निवडणुकातही याचे प्रतिबिंब दिसून आले मात्र आता पक्षाचे सर्वच प्रमुख नेते हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने येथे येत असून येथील सगळी राष्ट्रवादीच तयारीला लागली आहे. यामुळे हल्लाबोलच्या निमित्ताने स्थानिक राजकारणाची मैफिल बहरणार अन् एनर्जी देणारा बूस्टर डोस मिळण्याचा आशावाद आहे.

भुजबळांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेण्यापूर्वी सर्वप्रथम येवला राष्ट्रवादीमय करून टाकला होता. मागील दहा-बारा वर्ष हे समीकरण कायम राहिले असले तरी 2016 पासून मात्र या समीकरणाला छेद गेला आहे. भुजबळ तुरुंगात असल्याने येथील विकास देखील रोडावला असून पक्षाची जी भरारी सुरू होती ती विविध निवडणुकातील पिछेहाटीतून दिसून आली आहे. त्यातच मागील वर्ष दीड वर्षांत सगळेच भुजबळांच्या जामीन व सुटकेकडे नजरा लावून असल्याने पक्ष काहीसा शांत झाला होता. मात्र हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा एकदा कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

भुजबळांची येथील राजकारणातील उणीव भरून काढण्याचे काम प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे नेटाने करत आहेत. स्थानिक राजकारणात नगरपालिका व जिल्हा परिषदेत निवडणुकीत त्यांची निर्माण झालेली नाराजी देखील पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी दूर केली आहे. राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्षपद त्यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांना देऊन पवारांनी येवल्यात पक्षाला भासणारी उणीव दूर केली असल्याने शिंदे देखील जोमाने कामाला लागलेले आहेत.

सोबतच पक्षाचे जेष्ठ नेते अंबादास बनकर यांच्यासह कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, अरुणमामा थोरात यांची देखील खंबीर साथ भुजबळांच्या अनुपस्थितीत पक्षाचे राजकीय पटलावरील मूल्य टिकवून ठेवण्यासाठी मिळत आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मरगळ झटकून हल्लाबोलच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतल्याने विधानसभेच्या प्रचाराची ही रंगीत तालीम कशी यशस्वी होणार हे उद्या शुक्रवारी स्पष्ट होईलच.

पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणारे हे आंदोलन खरेतर नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी अपयशी ठरल्याने रोषाला सामोरे जाणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात आहे. सरकारने जनतेची दिशाभूल चालवल्याचे स्पष्ट आरोप ही नेते मंडळी करणार हे उघड आहे. मात्र पक्षाचे नेते व येथील आमदार भुजबळ तुरुंगात असल्याने त्या संदर्भात पक्षाची भूमिका काय यावर ही नेते काय बोलणार याची मात्र तमाम येवलेकरांना उत्सुकता लागून आहे. मागील तीन वर्षांत प्रथमच मुख्य नेते येथे येत असल्याने आणि भुजबळांचीही अनुपस्थिती असल्याने या हल्लाबोल विषयी राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वांनाच औत्सुक्य आहे म्हणूनच प्रचंड गर्दीत ही सभा होणार हे नक्की आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनाची धुरा माणिकराव शिंदे यांच्याकडे आहे. त्यातच सर्व नेते मंडळी आपल्या फौजफाट्यासह येवल्यात मुक्काम करणार आहेत. शनी पटांगणात उद्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार असून त्यानंतर या नेत्यांच्या नेत्यांच्या भोजनाची व्यवस्था शिंदे यांच्या निवासस्थानीच केलेली आहे. यानिमित्ताने पवारांशी शिंदेंचे असलेले सलोख्याचे संबंध पुन्हा एकदा तालुक्यात चर्चेला आले आहेत.

जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सताधारी अपयशी ठरले आहेत. याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनातून प्रमुख नेते येथे आज येत आहेत. आज भुजबळ साहेबांची अनुपस्थिती जाणवत आहे. मात्र पक्षाच्या येथील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हल्लाबोलची जोरदार तयारी केल्याने आजच्या सभेला प्रचंड गर्दी होणार आहे, असे माणिकराव शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news north maharashtra news rashtrawadi congress halla bol yewala