शिधापत्रिकाधारक व निराधार लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी  बेमुदत उपोषण

रोशन खैरनार
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सटाणा : बागलाण तहसील कार्यालयातर्फे नव्याने शिधापत्रिका देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना अद्यापही धान्य मिळत नसून हे लाभार्थी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत.

सटाणा : बागलाण तहसील कार्यालयातर्फे नव्याने शिधापत्रिका देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना अद्यापही धान्य मिळत नसून हे लाभार्थी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. महसूल विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना त्वरित धान्य उपलब्ध करून द्यावे आणि तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या वृद्ध, दिव्यांग, विधवा व निराधार लाभार्थ्यांची हेळसांड थांबवून त्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी तरसाळीचे माजी सरपंच व अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांतीदलाचे बागलाण तालुका उपाध्यक्ष लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांनी आज सोमवार (ता.२६) पासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. 

आज सकाळी 11 वाजता लखन पवार यांच्यासह क्रांतीदलाचे उपाध्यक्ष भावसिंग पवार, विनायक सोनवणे, प्रभाकर पवार यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. उपोषणकर्त्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात, महसूल विभागातर्फे तालुक्यातील नवीन व विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांना गेल्या दीड वर्षांपूर्वी नव्या शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. मात्र या शिधापत्रिकाधारकांना अद्यापही धान्य मिळालेले नाही. या शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठीही टाळाटाळ केली जात आहे.

स्वस्त धान्य दुकानदारास याबाबत विचारले असता ते लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अपमानास्पद वागणूक देतात. यामुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होत असून त्यांची फसवणूक केली जात आहे.

तालुक्यातील वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा लाभार्थ्यांच्या संजय गांधी निराधार योजनेची विविध प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात तालुक्यातील लाभार्थ्यांना गेल्या एक ते दीड वर्षांपासून ऑनलाईनच्या नावाखाली फिरवले जात आहे. सेतु संचालकांना या योजनेच्या संकेतस्थळाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नाही तसेच प्रशासनातर्फे त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. याबाबत संजय गांधी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता ते लाभार्थ्यांना योग्य प्रकारे माहिती देत नसून त्यांची अडवणूक करतात. या कर्मचाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करावी.

मालेगाव तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाकडून नवीन लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर केली जात आहेत. मात्र बागलाण तालुक्यात लाभार्थ्यांची अडवणूक का केली जात आहे. प्रशासनाला अनेकवेळा निवेदने देऊनही आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने शासनाच्या योजनांपासून वंचित असलेल्या तालुक्यातील शिधापत्रिकाधारक, दिव्यांग, विधवा, वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बेमुदत उपोषण करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आज दिवसभरात तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठींबा दिला.

उपोषणात राजेंद्र सावकार, नाना मोरकर, अरुण मोहन, प्रशांत मोहन, त्र्यंबक गांगुर्डे, सुमन रौंदळ, शेवंताबाई माळी, सुंदरबाई पिंपळसे, भागाबाई शिंदे, सुशीला जगताप, धनुबाई रौंदळ, जिजाबाई पवार, अनिल रौंदळ, ज्ञानेश्वर गोसावी, सागर ठोके, विलास चव्हाण, कमल गांगुर्डे बाबूलाल मोहन, योगेश पवार, भाऊसाहेब जगताप, संजय मोहन, विजय रौंदळ, दीपक ठोके, व्यंकोजी रौंदळ आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी सहभागी झाले आहेत. 

Web Title: Marathi news north maharashtra news ration card hunger strike