सटाणा नगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

रोशन खैरनार
शनिवार, 3 मार्च 2018

सटाणा : सटाणा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी पालिकेने सन २०१८ - १९ या आर्थिक वर्षाकरिता कोणतीही करवाढ नसलेले १०७ कोटी व ३१ लाख ६८ हजार ६११ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रकास नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.  

सटाणा : सटाणा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी पालिकेने सन २०१८ - १९ या आर्थिक वर्षाकरिता कोणतीही करवाढ नसलेले १०७ कोटी व ३१ लाख ६८ हजार ६११ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रकास नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.  

अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी पुढीलप्रमाणे : नववसाहतीमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी १९ लाख रुपये व विशेष रस्ता अनुदान अंतर्गत २ कोटी २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शौचालय बांधणे, पाईपलाईन टाकणे, एलईडी पथदीप बसवणे आदी कामांसाठी दोन कोटी रुपये, शहराच्या विविध प्रभागातील मोकळे भूखंड विकसित करण्यासाठी २ कोटी व वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १ कोटी ४० लाख रुपये, ईदगाह परिसर, दफनभूमी व अल्पसंख्याक परिसरातील विकास कामांकरिता ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात पालिका फंडातून २२ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रा परिसर सुशोभिकरण करणे ५५ लाख, म्हाडा घरकुल योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, अनुसूचित जाती-जमाती व इतर घटकांसाठी घरे बांधून देणे करिता १ कोटी ३३ लाख रुपये तर रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी ४६ लाख ५८ हजार, वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या लाभकरिता १ कोटी ७३ लाख, शहरातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत व प्रक्रिया व कचऱ्याचे व्यवस्थापन आदी कामांसाठी ३ कोटी ८५ लाख व १४ व्या वित्त आयोग अंतर्गत २ कोटी आणि पालिकेतील सेवानिवृत्त वेतनधारकांची देणी देण्यासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील पाणीपुरवठा योजना, स्वच्छता व आरोग्य आणि सौरउर्जा प्रकल्पासाठी २२ कोटी ४ लाख ५० हजार रुपये खर्च केले जाणार असून त्यात पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर सौरउर्जा प्रकल्प उभारणे ५० लाख, जुन्या गटारींची दुरस्ती १५ लाख, शहरातील घनकचरा संकलन २० लाख ५० हजार, जंतुनाशक खरेदी व फवारणी १६ लाख ५० हजार रुपयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा योजनेसाठी १५ कोटी, भुयारी गटार योजना व मलनिस्सारण केंद्राच्या जागेसाठी ५ कोटी, सुजल निर्मल अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी ३८ लाख ५० हजार, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी ३३ लाख व विंधन विहिरीकरिता ११ लाख एवढी तरतूद करण्यात आली आहे.

या विशेष सभेत उपनगराध्यक्ष सुवर्णा नंदाळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, नगरसेवक राहुल पाटील, दिनकर सोनवणे, काकाजी सोनवणे, राकेश खैरनार, पुष्पा सूर्यवंशी, निर्मला भदाणे, संगीता देवरे, सुलोचना चव्हाण, सोनाली बैताडे, भारती सूर्यवंशी, डॉ.विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव, मुन्ना शेख, महेश देवरे, दीपक पाकळे, मनोहर देवरे, आशा भामरे, माणिक वानखेडे, हिरालाल कापडणीस आदि उपस्थित होते.

Web Title: Marathi news north maharashtra news satana municipal corporation