अडचणीच्या, दुर्गम शाळांतील महिलांच्या नियुक्तीला सुट्टी!

संतोष विंचू
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

येवला : राज्यात अनेक शाळा या दुर्गम अतिदुर्गम व गैरसोयीच्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी पोहोचणे भल्याभल्यांना गैरसोयीचे होते तेथे महिलांची हाल काय विचारावी. याच हेतूने ग्रामविकास विभागाने महिलांची अशा अडचणीच्या शाळांवर नियुक्ती न करण्याचा निर्णय आज गुरुवारी घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या महिला शिक्षीका सध्या कार्यरत आहे त्यांना मे मध्ये बदली देखील मिळणार आहे.

येवला : राज्यात अनेक शाळा या दुर्गम अतिदुर्गम व गैरसोयीच्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी पोहोचणे भल्याभल्यांना गैरसोयीचे होते तेथे महिलांची हाल काय विचारावी. याच हेतूने ग्रामविकास विभागाने महिलांची अशा अडचणीच्या शाळांवर नियुक्ती न करण्याचा निर्णय आज गुरुवारी घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या महिला शिक्षीका सध्या कार्यरत आहे त्यांना मे मध्ये बदली देखील मिळणार आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या म्हणजे वादाचा, चर्चेचा आणि लांबलचक चालणाऱ्या गुऱ्हाळाचा विषय आहे. मात्र या सगळ्या गोंधळात आज ग्रामविकास विभागाने धक्कादायक निर्णय घेऊन सर्वच शिक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागात असल्याने तेथे अगदी पायी जाऊन ड्युटी करावी लागते. किंबहुना जंगलातून निर्जन ठिकाणांवरूनही जाण्याची वेळ येते. अडचणीच्या परिस्थितीमुळे शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी मुक्कामी थांबणे देखील अडचणीचे होते. अशा ठिकाणी एकवेळ पुरुष वेळ निभावून नेतात मात्र महिलांना अशा ठिकाणी काम करणे जिकीरीचे बनत आहे. त्यामुळे यापुढे स्थानिक प्रतिकूल असलेल्या शाळांमध्ये तसेच जाण्या येण्यासाठी गैरसोयीच्या असलेल्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नियुक्ती होणार नाही.

महिलांसाठी अशा अडचणीच्या शाळा या काम करण्यास प्रतिकूल असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वप्रथम जाहीर करणार आहे. अशा जाहीर शाळांमध्ये महिला शिक्षकांना प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्तीने पदस्थापना दिली जाणार नाही. तसेच सध्या अशा जागी काही महिला कार्यरत असल्यास त्यांना मे 2018 च्या बदली प्रक्रियेत अर्ज करावेत म्हणजे त्यांची सोयीच्या ठिकाणी बदली करणे शक्य होणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. अर्थात ज्या महिलांची इच्छा असेल त्या मात्र अशा भागात काम करू शकणार असल्याचेही सांगण्यात येते.

पेठ, सुरगाणा सारख्या तसेच तालुक्याच्या मुख्यालयापासून कोसो दूर असणाऱ्या शाळा नेहमीच महिलांसाठी गैरसोयीच्या ठरत आल्या आहे. अशा गावात कुटुंब करून राहणे दूरच पण जाणे-येने देखील कठीण होऊन जाते किंवा अनेकांना जाण्याच्या सोयीत अर्धा पगार खर्च करावा लागतो. यामुळे कुटुंबाकडे व मुलाबाळांकडे होणारे दुर्लक्ष हे वेगळेच होते. या सगळ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला भगिनींना नक्कीच मोठा दिलासा दिल्याचे मानले जात आहे.

ग्रामीण भागात असे काही क्षेत्रे आहेत की तेथे शाळावर जाणे दिव्य ठरते.या संकटातून सुटका करून महिला शिक्षिकांची सुरक्षा व अवघड क्षेत्रात जाणेयेणे साठी होणारी ससेहोलपट व दळवळण सुविधे अभावी होणारया त्रासातून मुक्तता होणार आहे. निर्णय चांगला असून शासनाचे अभिनंदनच! असे मत येवल्याच्या प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शांताराम काकड यांनी व्यक्त केले. 

Web Title: Marathi news north maharashtra news schools teachers transfer