गिरणाचे पाणी कृष्णापुरीत सोडा, शेतकऱ्यांची मागणी

दीपक कच्छवा
मंगळवार, 13 मार्च 2018

लोकप्रतिनिधींसह अधिकार्याकडुंन मिळतेय केवळ अश्वासन

मेहुणबारे(ता.चाळीसगाव) - गिरणा धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात आल्याने दोन महिने नदी वाहिली. यात लाखो लिटर पाणी वाया गेले. दुसरीकडे गिरणेतील पाणी कृष्णापुरी धरणात सोडण्यासाठी वरखेडे (ता. चाळीसगाव) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची अक्षरशः भीक मागावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

लोकप्रतिनिधींसह अधिकार्याकडुंन मिळतेय केवळ अश्वासन

मेहुणबारे(ता.चाळीसगाव) - गिरणा धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात आल्याने दोन महिने नदी वाहिली. यात लाखो लिटर पाणी वाया गेले. दुसरीकडे गिरणेतील पाणी कृष्णापुरी धरणात सोडण्यासाठी वरखेडे (ता. चाळीसगाव) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची अक्षरशः भीक मागावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

वरखेडे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले कृष्णापुरी धरण सध्या कोरडेठाक झाले आहे. त्यामुळे धरण परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. गिरणा धरणातून शेतीसाठी पांझण डावा कालव्याला पाणी सोडण्यात आले. कालव्याचे पाणी कृष्णापुरी धरणात सोडावे यासाठी या भागातील शेतकऱ्यांची पूर्वीपासून मागणी आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी त्यांना केवळ आश्वासनावर ठेवले आहे. 

शेतकरी आले रडकुंडीला 
कृष्णापुरी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी आमदार उन्मेष पाटील यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली होती. त्यांना पाणी सोडण्यासंदर्भात आश्‍वासनही देण्यात आले होते. मात्र, गिरणा धरणातून दोन्ही वेळा आवर्तन सोडण्यात आल्यानंतरही "कृष्णापुरी'त पाणी आले नाही. सद्यःस्थितीत हा भाग उन्हामुळे होरपळत असताना, पाणी सोडण्यास तब्बल दोन महिन्यांपासून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकरी "गिरणा'च्या पाण्यासाठी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. 

कांदा पिकाचे नुकसान 
वरखेडेसह जवळच्या लोंढे, कृष्णापुरी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा लागवड केली आहे. कांदा पिकाला पाण्याची गरज असते. सद्यःस्थितीत विहिरींना पाणी नसल्याने लागवड केलेले कांदा पीक सोडून द्यावे लागत आहे. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बळीराजा आपल्या रक्ताचे अक्षरशः पाणी करून पिके जगवतो आहे. निगरगट्ट प्रशासनाकडे पाण्याची भीक मागूनही पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले 

ठरावांना केराची टोपली? 
कृष्णापुरी धरणात पाणी टाकण्यासंदर्भात वरखेडे, लोंढे व विसापूर या तिन्ही गावांत झालेल्या ग्रामसभांमध्ये ठराव करण्यात आले होते. हे ठराव पाटबंधारे विभागाकडे देण्यात आले होते. याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकरी पाटबंधारेच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना एकही जबाबदार अधिकारी भेटत नाही. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. एकूणच ग्रामसभांच्या ठरावांना पाटबंधारे विभागाने केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घ्यावी 
गिरणा धरणातून कृष्णापुरीमध्ये पाणी सोडण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने देखील ग्रामस्थांना तसे सांगितले होते. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशानंतरच पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या भागातील वस्तुस्थिती पाहून गिरणा धरणाचे पाणी कृष्णापुरी धरणात सोडण्यासंदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

कृष्णापुरी धरणात पाणी टाकण्यासंदर्भात मागणी केली आहे. त्यानुसार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी या विषयावर चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 
- एस. जे. माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

Web Title: marathi news north maharashtra water crisis girna dam