कांद्याचा भाव पोचला चार हजाराच्या पुढे.... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिक ः दिवाळीनंतर लगेच कांद्याचा भाव सरासरी क्विंटलला चार हजार रुपयांच्या पुढे पोचला आहे. पण या भावाने विकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्याचवेळी लेट खरीप कांद्याचे नुकसान पन्नास टक्‍क्‍यांच्यापुढे पोचले आहे. अशातच, नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी किमान पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने कांद्याचे भाव कमी होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

अवकाळी पावसाने कांद्याच्या पट्यात दणका दिला असल्याने लेट खरीप 50 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी निम्मे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. पंचनाम्यानंतर कांद्याचे नेमके किती नुकसान झाल्याची याची स्थिती स्पष्ट होईल. लासलगावमध्ये दिवसभरात 700 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी 4 हजार 100 रुपये असा भाव मिळाला. काल (ता. 30) इथे 3 हजार 900 रुपये क्विंटल या सरासरी भावाने उन्हाळ कांदे विकले गेले होते. शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांनी संवाद साधल्यावर कुणी एक ट्रॉलीभर, तर कुणी अर्धी ट्राली विकण्यासाठी आणली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कांद्याचे आगार असलेल्या पिंपळगाव बसवंत आणि विंचूर बाजार समितीत जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच, 4 हजार 300 रुपये क्विंटल असा सरासरी भाव निघाला आहे. 

बेंगळुरुमध्ये 3 हजार 700 चा भाव 
बेंगळुरुमध्ये 3 हजार 700 रुपये क्विंटल असा भाव निघाला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या घाऊक बाजारपेठेत कांदा 3 हजार 375 रुपये क्विंटल या भावाने विकला गेला. आता देशातंर्गत बाजारपेठेत वाढत चाललेल्या भावाचे पडसाद या आठवड्यात दिल्लीच्या बाजारपेठेत उमटतील. इंदूरमध्ये 3 हजार 900, तर धुळ्यात 3 हजार 850 रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदे विकले गेले आहेत. मुंबईतील कांद्याच्या भावात 3 हजार 900 रुपयांवरुन 4 हजार 100 रुपयांपर्यंत उसळी आली आहे. विंचूरमध्ये 3 हजार 650 रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला होता. 

""शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा फारसा शिल्लक नाही. अशातच, लेट खरीप कांद्याचे नुकसान पावसाने केले आहे. त्यामुळे आगामी काळात मागणी आणि पुरवठा यात तफावत राहणार असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्‍यता अधिक आहे.'' 
- नितीन जैन (कांदा व्यापारी, लासलगाव)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news onion