शरीराला चहा अन देशाला चहावाला घातक - अमोल मिटकरी 

live photo
live photo

पाचोरा - ‘ज्यांना मका काय आहे हे ठाऊक नाही, ज्यांना कापसाच्या गाठोड्याची गाठ बांधता येत नाही, ज्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, अशांना शरद पवारांनी काय केले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. राम मंदिराच्या उभारणीच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी शिवरायांच्या स्मारकाचे काय झाले? याचे उत्तर द्यावे. शरीराला चहा आणि देशाला चहावाला घातक आहे’, असा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी लगावला. 

शहरातील महालपुरे मंगल कार्यालयात आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वाघ अध्यक्षस्थानी होते. मेळाव्यात शिवसेना व युवा सेनेला जय महाराष्ट्र करून दिलीप वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर संजय गरुड, विजया पाटील, कल्पना पाटील, योगेश देसले, संजय वाघ, खलील देशमुख, दगाजी वाघ, दत्तात्रय पवार, नितीन तावडे, विकास पाटील, विजय पाटील, व्ही. टी. जोशी, सतीश चौधरी, शालीक मालकर, प्रल्हाद पाटील, प्रकाश पाटील, सुदाम वाघ, भूषण वाघ, अशोक मोरे, सूरज वाघ, अजय अहिरे, रणजीत पाटील, बशीर बागवान, ॲड. अण्णासाहेब भोईटे, शशिकांत चंदिले, प्रा. भागवत मालपुरे, ललित वाघ, अजहर खान, शेख रसुल उस्मान, नाना देवरे, संतोष जाधव, महिला आघाडीच्या सुचेता वाघ, ज्योती वाघ, सरला पाटील, सुरेखा पाटील, प्रा. मंगला शिंदे, ललिता चौधरी, नीलिमा पाटील, योजना पाटील, जयश्री मिस्तरी यांच्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. दीड तासाच्या भाषणात अमोल मिटकरी यांनी शिवसेना-भाजप सरकारच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेतला. कर्जमाफी, पीक विमा याबाबत युती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्यातील आजची स्थिती पाहिली तर शिवसेना हा सर्वांत लाचार पक्ष दिसत आहे. हे त्यांनी उपस्थितांकडून आवाजी मतदानाने वदवून घेतले. ते पुढे म्हणाले, की बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, त्यांच्या नोकऱ्या जात आहेत.

शेतकरीच विवंचनेत असल्याने शेतमजुरांना कामे नाहीत. शेती विषयक योग्य धोरण शासनाला राबवता येत नाही. केवळ राम मंदिर व ३७० कलम यामुळे राज्याचे प्रश्न मिटणार नाहीत. महाराष्ट्रातील जनतेचे युती शासनाने हाल केले असून, राज्यातील महाजनादेश व जनआशीर्वाद यात्रेप्रसंगी अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवत शाई व कडकनाथ कोंबड्या फेकून त्यांचा निषेध होत आहे. बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार व अजित पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांचा त्यांनी उल्लेख केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे शेतकरी व समाजातील सामान्य कष्टकरी जनता आहे.

सत्ताधाऱ्यांच्या अशा दडपशाहीला राष्ट्रवादी काँग्रेस भीक घालणार नाही. शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्या नावे सत्ता भोगणारे आता उघडे झालेले आहेत. शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी व प्रेम असेल तर शिवरायांचे वंशज उदयनराजेंना मुख्यमंत्री करणार असल्याचे जाहीर करावे असे सांगून प्रत्येकाने आपला संताप व असंतोष मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करून ही अन्याय सत्ता राज्याच्या भूमीत गाडून टाका असे आवाहन केले. नितीन तावडे, योगेश देसले, दिलीप वाघ यांची भाषणे झाली.

दिलीप वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या कामासंदर्भात टीकात्मक विवेचन करून आमदारांनी ठेकेदारांपासून अनेक कामांचे श्रेय लाटले असा आरोप केला. नितीन तावडे यांनी प्रास्ताविक केले. विकास वाघ यांनी सूत्रसंचालन केले. भूषण वाघ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com