यात्रा पदासाठी नसून, महाराष्ट्र घडविण्याच्या स्वप्नासाठी ः युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

पाचोरा ः मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांचा नवमहाराष्ट्र घडविण्यासाठीचा आशीर्वाद घेऊन निघालो असून, ज्यांनी शिवसेनेच्या वाटचालीत व निवडणूकीत शिवसेनेला सहकार्य केले; त्यांचे आभार मानण्यासाठी व जे अजूनही शिवसेनेच्या विचारापासून दूर आहेत त्यांची मने जिंकण्यासाठी मी निघालो आहे. माझी ही यात्रा कोणत्याही पदासाठी नसून नवा महाराष्ट्र घडविण्याच्या स्वप्नासाठी आहे. आपली मने जिंकली म्हणजे महाराष्ट्र जिंकता येईल; आपण माझ्यासोबत असाल तर हात उंचावून साद द्या असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्टातील जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज (ता.18) पाचोरा येथून करण्यात आला. यानिमित्ताने दुपारी दीडच्या सुमारास आदित्य ठाकरे यांचेसह सेनेच्या दिग्गज नेत्यांचे शहरात आगमन झाले. जळगाव चौफुलीजवळून शिवसैनिकांनी बाईक रॅली काढून त्यांना सभास्थानापर्यंत आणले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयास भेट दिली. माजी आमदार तथा निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या निवासस्थानी गेले. त्यांची कन्या वैशाली सूर्यवंशी, पत्नी कमल पाटील व जावई ऍड. नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचे सांत्वन केले. 
गगनभेदी घोषणाबाजीने करत त्यांचे स्वागत करण्यात आले; माजी नगराध्यक्ष तथा आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील यांनी त्यांचे औक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ वाढवून जन आशिर्वाद यात्रेचा शुभारंभ झाल्याचे जाहिर केले. याप्रसंगी पर्यावरण मंत्री रामदास कदम, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार चिमणराव पाटील, संजय सावंत, गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. 
ठाकरे म्हणाले, की नवा महाराष्ट्र घडवायची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक माणूस शिवसैनिक व्हावा. त्याशिवाय महाराष्ट्र भगवा करता येणार नाही. शिवसेनेची विचारधारा सर्वसामान्यांच्या विकास व उद्धारासाठी आहे. जेथे त्रास आहे, तेथे मदत करणे, अन्याय असेल तेथे न्याय मिळवून देणे; यासाठीच शिवसेना कार्य करीत आली आहे. माझी ही यात्रा म्हणजे तीर्थयात्रा असल्याचे सांगून तुम्ही यासाठी तयार आहात का? यासाठी मला आशीर्वाद देणार का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी जनतेला हात उंचावून साथ देण्याचे आवाहन केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora yuvasena aditya thakre jan aashirwad yatra