अपंगत्वावर मात,अवजारे बनविण्यात पिंकी पारंगत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नाशिकः नाशिकपासून दहा किलोमीटर अंतरावरील गिरणारे गाव. जळत्या निखाऱ्यातून तापलेले लालभडक लोखंड काढून त्यावर घाव घालत पिंकी पवार ही युवती शेतीची अवजारे बनवते. ती इतर युवतींसारखी असली, तरीही तिच्या दोन्ही पायांतील ताकद नाहीशी झालीय. पण न डगमता पायावर उभी राहिलीय. एवढंच नव्हे, तर कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत तिने बहिणींची लग्ने लावून दिली.जागतिक महिला दिनानिमित्ताने पिंकीच्या जिद्दीचा आढावा खास "सकाळ'च्या वाचकांसाठी घेतला. 

पिंकी लहान असताना तिचे पाय चांगले होते. इतर मुलींसारखी ती खेळायची-बागडायची. पण एकेदिवशी पोलिओने तिचे दोन्ही पाय निकामी झाले. कसेतरी तिने चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणी झालेल्या आघातामुळे ती खचली नाही. वडील सुधाकर पवार हे लोहारकाम करत असताना पिंकी पाहत होती. एकदिवस वडील गावाला गेले असताना शेतकऱ्याला कोयत्याला धार लावायची होती. पिंकीने धार लावून दिली अन्‌ इथेच आत्मविश्‍वासाचे धुमारे तिच्यामध्ये फुटले. त्या दिवसापासून ती वडिलांबरोबर कौटुंबिक व्यवसाय करू लागली. 
पिंकीची घरची परिस्थिती बेताचीच. तिला तीन भाऊ आणि चार बहिणी असा परिवार. तिचे मातृछत्र हरपले अन्‌ वडिलांना वयोमानाने काम करणे कठीण झाले होते. मग पिंकीने भाऊ-बहिणींना शिकविण्यासाठी हातोडा हातात घेतला. कष्टाचे काम करणे जड होते; मात्र कुटुंबासाठी काम करण्याची जिद्द असल्याने हातोडा खाली ठेवला नाही. सत्तावीस वर्षे वयाच्या पिंकीने आयुष्याच्या लढाईत सर्व दुःखांना मागे टाकले. 

गावाची "ती' झाशीची राणी! 
पिंकी पवारचा गावात जाऊन कुणी पत्ता विचारल्यास ग्रामस्थ त्या व्यक्तीला तिच्या थेट दुकानापर्यंत नेतात इतकी पिंकी प्रसिद्ध आहे. तिला ग्रामस्थ गिरणारेची "झाशीची राणी' असे संबोधतात. पायाने चालता येत नसल्याने तिचे हात हेच तिचे मुख्य आधार बनले आहेत. सकाळी आठला भट्टी पेटवून जळत्या निखाऱ्यावर शेतीचे अवजारे बनविण्यात ती मग्न होते. तिला पाहून कुणी मदत करण्याचा प्रयत्न केला, तर पिंकी मदत घेत नाही. "मी केलेल्या वस्तू विकत घ्या, म्हणजे माझे घर चालेल', असे ती सांगते. गेल्या 15 वर्षांपासून अधिक काळापासून विळा, कोयता, पहार, टिकाव आणि शेतीची इतर अवजारे बनविण्यात तिचा हातखंडा आहे. या व्यवसायाला ती फॅब्रिकेशनची जोड देऊन व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. 

गिरणारेवासीयांनी केलेले सहकार्य मला विसरता येणार नाहीत. व्यवसायवृद्धीसाठी अपंग कल्याण योजनांचा लाभ मिळावा, अशी माझी इच्छा आहे. आर्थिक समस्या सुटल्यास गरुडझेप घेणे मला शक्‍य होईल. 
- पिंकी पवार 
 
Web Title: marathi news pinki pawer news