पोलीस भरतीसाठी बोगस "क्रिमीलेअर' प्रमाणपत्राचा वापर 

residenational photo
residenational photo

नाशिक, ता. 28 : नाशिक पोलीस आयुक्तालयात गेल्यावर्षी झालेल्या पोलीस भरतीत बॅण्डपथकात निवड झालेल्या एका महिला उमेदवाराने बोगस क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शितल संपत गायकवाड या महिला उमेदवाराची निवड रद्द केली जाणार असून सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतिम अहवालानंतर तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी "सकाळ'ने गेल्या 18 तारखेला "शहर पोलीस भरतीमध्ये घोळ' या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. 

2017 मध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात भरती प्रक्रिया राबवली गेली. यात पोलीस शिपाईसह बॅण्डपथकातील रिक्त पदांसाठीही भरती घेतली गेली. यावेळी महिला उमेदवारांनी अर्ज केला. त्यानुसार प्रक्रिया राबवत शितल संपत गायकवाड या महिला उमेदवाराची निवड केली. मात्र तिच्या निवडीविरोधात राजुरा (जि. चंद्रपूर) येथील शुभांगी महादेव आंबेकर या उमेदवाराने आक्षेप घेत विरोध केला. शितल गायकवाड हिने शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करतांना बनावट क्रिमीलेअर प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाला सादर केले. त्यासंदर्भातील पुरावेच शुभांगी आंबेकर हिने पोलीस प्रशासनाला सादर केले होते. पण त्याची दखल न घेतल्याने अखेर पत्रकार परिषद घेत तिने दाद मागितली. 

यासंदर्भातील सविस्तर वृत्त "सकाळ'मधून प्रसिद्ध होतच पोलीस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त टी.एन. तांदळे यांच्यामार्फत चौकशी नेमली. चौकशीअंती नाशिक तहसिल कार्यालयाकडून शितल गायकवाड हिने सादर केलेले क्रिमीलेअर प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवालच तहसिल कार्यालयाकडून पोलीसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे शितल गायकवाड हिची निवड रद्द केली जाणार आहे. अंतिम अहवालानंतर तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाण्याची शक्‍यता आहे. 

तहसिलच्याच नावाचे प्रमाणपत्र ठरले बोगस 
संशयित शितल गायकवाड हिने पोलीस प्रशासनाला दिलेल्या कागदपत्रांत क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिले. जे नाशिक तहसिल कार्यालयाकडून तिला 2016 मध्ये देण्यात आलेल्याची प्रमाणपत्रावर नोंद आहे. याबाबत शुभांगी आंबेकर हिने माहितीच्या अधिकारान्वये मागितलेल्या माहितीतून तहसिलचा संबंधित प्रमाणपत्र देण्याचा विभाग 2013 मध्ये बंद करण्यात आल्याने हे प्रमाणपत्र तहसिल विभागाने दिलेले नाही असे स्पष्ट केले. याचआधारे पोलिसांनीही तहसिलाकडे प्रमाणपत्राच्या सत्यतेबाबतचा अहवाल मागविला. त्यांनाही त्याचप्रमाणे उत्तर दिल्याने शितलने सादर केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून तहसिल कार्यालयाच्या नावाखाली दलालांकडून बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे म्हणाल्या,अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पण आक्षेप घेण्यात आलेल्या महिला उमेदवाराचे क्रिमीलेअर प्रमाणपत्र बोगस असल्याचे तहसिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com