पोलीस महिलेला धमकी देणाऱ्यास गंगापूर पोलिसांचे पाठबळ

residentional photo
residentional photo

नाशिक : चिमुकल्या मुलीच्या हौसेखातर दिलेल्या कॅलेंडरच्या फोटोशुटच्या ऑडिशनसाठी पैसे घेऊन, ते परत न करता फसवणूक करणाऱ्यास जाब विचारला असता, संशयिताने पोलीस महिलेशी अरेरावी करीत "एका फोनने तुझी वर्दी उतरवू शकतो' अशी धमकी दिली. याप्रकरणी थेट वर्दीचा अवमान करीत दमदाटी केल्याने गंगापूर पोलिसात पोलीस महिलेने तक्रारीसाठी धाव घेतली असता, पोलिसांकडून फसवणूक व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत, संशयिताला वाचविण्याचा प्रयत्न गंगापूर पोलिसांनी केला आहे. 

वृषाली सुरेश जोशी (रा. कंफर्ट झोन सोसायटी, अंबडगाव) असे तक्रारदार पोलीस महिलेचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, संशयित स्वप्निल खैरनार याचे गंगापूर रोडवर कॉस्मो पिपल्स या नावाचे इन्स्टीट्युट असून काही महिन्यांपूर्वी त्याने कॅलेंडरसाठी लहान मुलींच्या फोटोशूटसाठी ऑडिशनची जाहिरात दिली होती. श्रीमती जोशी यांनी त्यांच्या 7 वर्षांच्या मुलीसाठी संपर्क साधला असता, संशयित खैरनार याने 500 रुपये नोंदणीसाठी घेऊन फोटोशूट केले. त्यानंतर त्याच्या इन्स्टीट्युटमधून श्रीमती जोशी यांना संपर्क साधून ऑडिशनमध्ये त्यांच्या मुलीची निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना 5 हजार रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी गेल्या ऑक्‍टोबर 2018 मध्ये शुल्क भरले. परंतु, त्यानंतर त्यांच्या मुलीची ऑडिशनही घेण्यात आली नाही. 
यासंदर्भात त्यांनी वारंवार विचारणा केल्यानंतरही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे श्रीमती वृषाली जोशी या आज दुपारी (ता.10) साडेबाराच्या सुमारास संशयित खैरनार याच्या इन्स्टीट्युटमध्ये गेल्या आणि त्यांनी भरलेले शुल्क परत मागितले. त्यावरून संशयित खैरनार याने अरेरावी करीत, पोलीस वर्दीविषयी अवमानास्पद वक्तव्य करीत, एक फोन केला तर आत्ताच्या आता तुझी वर्दी उतरवू शकतो. तुमच्यासारखे पोलीस अन्‌ अधिकारी खिशात घेऊन फिरतो. कोणाकडेही तक्रार करा असे म्हणत तुझी सोशलमीडियावर बदनामी करीन अशी धमकीही दिली. सदरप्रकरणी श्रीमती जोशी यांनी गंगापूर पोलिसात धाव घेत घटना सांगितली असता, गंगापूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. 

महिला पोलीसालाच मिळेना पोलिस ठाण्याकडून न्याय 
सदरच्या घटनेप्रकरणी प्रत्यक्षात पोलिस ठाण्यात फसवणुकीसह दमदाटी व बदनामी केल्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होते अपेक्षित असताना, गंगापूर पोलिसांनी संशयित खैरनार या पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे. संशयित खैरनार याने अशारितीने अनेक पालकांची फसवणूक केल्याचीही शक्‍यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गंगापूर पोलीस ठाण्याविषयी अनेक तक्रारी असतानाही त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही दखल घेतली जात नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे. गेल्याच आठवड्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या गुंतवणूकदारांना गंगापूर पोलिसांनी पिटाळून लावल्याची घटना ताजी आहे. तर आता पोलीस महिलेच्या गंभीर तक्रारीचीच त्यांनी बोळवण केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com