शिवभक्तांच्या मनाबरोबरच प्रदक्षिणा मार्गही व्हावा निर्मळ 

शिवभक्तांच्या मनाबरोबरच प्रदक्षिणा मार्गही व्हावा निर्मळ 

नाशिक ः कैलास राणा शिवचंद्र मौळी । फणिंद्र माथा मुकुटी झळाळी । कारण्यसिंधु भव दुःख हारी । तुजविण शंभो मज कोण तारी।। असे भगवान शंकराचे वर्णन केले जाते. या त्र्यंबकराजाच्या श्रावणातील प्रदक्षिणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही तिसऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेचे महत्त्व हे वेगळेच अधोरेखित करते. हेच पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी दर वर्षी लाखो भाविक या दिवशी देशभरातून हजेरी लावतात. मात्र, या प्रदक्षिणेच्या मार्गावरील वाढत्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाला ठेच पोचत आहे. खरंतर या मार्गावरील निसर्ग हा अत्यंत सुंदर असून, तो डोळ्यांत साठवणे हीदेखील एक वेगळीच अनुभूती असते. तेव्हा चला एकत्र येऊया या मार्गावरील प्रदूषण रोखून स्वच्छ, सुंदर मार्ग तयार करूया, अशीच हाक द्यावीशी वाटते. 
श्रावणातील प्रदक्षिणा ही प्रत्येकासाठी एक पर्वणीच ठरत असते. या प्रदक्षिणेत लहानांपासून वृद्धांपर्यंत सारेच सहभागी होतात. खऱ्या भाविकांबरोबर हौशानवशांची संख्याही वाढत चालल्याने ती आता सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. वर्षानुवर्षे अस्वच्छतेचे हे चित्र काही बदलायला तयार नाही. सोमवारी एकदा प्रदक्षिणा होऊन गेल्यानंतर या मार्गावरील चित्र अतिशय विदारक असते. या मार्गावर गुटख्याच्या पुड्या, खाद्यपदार्थांचा प्लॅस्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, केळीच्या साली, अस्ताव्यस्त फेकलेली साबूदाण्याची खिचडी, तसेच अन्य खाद्यपदार्थ, मद्याच्या बाटल्या अशा गोष्टींचा खच पडलेला दिसतो. या भागात सतत पाऊस पडत असल्यामुळे त्या कचऱ्यावर पाणी पडल्यानंतर तेथे दुर्गंधी सुटते. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असतेच. शिवाय प्लॅस्टिक कचरा नष्ट होत नसल्याने पर्यावरणाचीही अपरिमित हानी होत असते. 

प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे नियोजन 
मागील वर्षी डॉ. भरत केळकर, महादू स्वामी आदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या सोमवारनंतर दुसऱ्या दिवशी या मार्गाची साफसफाई केली होती. यात तब्बल 80 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवत तब्बल शंभर गोण्या कचरा संकलित केला होता. यंदाही त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून, दोनशे स्वयंसेवक अपेक्षित धरण्यात आल्याचे श्री. स्वामी यांनी "सकाळ'ला सांगितले. यासाठी प्रत्येकी दहा जणांचे वीस गट तयार करण्यात येणार आहेत. त्यांपैकी दहा गट या मार्गावर, तर उर्वरित दहा जणांचा गट परतीच्या मार्गावरील साफसफाई करील, असे त्यांनी सांगितले. 


उपाययोजना अशा 
- भाविकांसाठी कापडी पिशव्या देणे 
- खाद्यपदार्थांची विक्री, तसेच वाटप करणाऱ्यांनीच त्यांचा कचरा जमा करण्याची जबाबदारी घ्यावी 
- जागोजागी कचरा संकलन पेटी ठेवणे 
- मार्गाच्या सुरवातीलाच जनजागृतीसाठी फलक लावावेत 
- वैद्यकीय पथक असावे 

प्रदक्षिणा मारणे हे केवळ मनाच्या पावित्र्यासाठीच नसून निसर्गाचा भरपूर आनंद त्यातून घेता येतो. प्रशासनाकडून जागोजागी कचराकुंड्या ठेवल्या पाहिजेत. युवकांनी या मार्गावर पावित्र्य जपत परिसरातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. या मार्गावरचे प्रदूषण रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 
- डॉ. भरत केळकर, नाशिक 

(फोटो- 58895) 
---- 
त्र्यंबकराजाची प्रदक्षिणा हा निसर्गाचा अद्‌भुत अनुभव आहे. तो बळीराजाचे नुकसान, मद्यपान, धूम्रपान टाळत प्रदक्षिणेचे पावित्र्य राखा. त्याचबरोबरच निसर्गाचा भरभरून आनंदही घ्या. 
- महादू स्वामी, नाशिक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com