वाढीव मालमत्ता करा विरोधात विरोधक एकवटले 

residenational photo
residenational photo

नाशिक : प्रशासनाने निवासी, अनिवासी व औद्योगिक मालमत्ता कर वाढीच्या ठेवलेल्या प्रस्तावाचे खुलेआम समर्थन करताना मोर्चे आलेचं तर आमच्या पध्दतीने तोंड देण्याची भाषा बोलणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे सह माकप या प्रमुख विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून एकत्रित पणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात व्यापारी, सामाजिक संघटनांसह औद्योगिक संघटनांना देखील सोबत घेतले जाणार आहे. 
मंगळवारी झालेल्या महासभेत प्रशासनाने निवासी मालमत्ता करात 33, अनिवासी 64 तर औद्योगिक मालमत्ता करामध्ये तब्बल 82 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सत्ताधारी भाजपच्या ठराविक नगरसेवकांनी करवाढीचे जोरदार समर्थन केले तर शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार विरोध करतं प्रशासन व भाजपचा निषेध केला. प्रशासनाच्या करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यानंतर रस्त्यावर देखील करवाढीचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या रामायण निवासस्थानी घरपट्टीच्या देयकांची होळी केली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विभागिय पातळीवर सहा आंदोलने करून एकत्रित मोर्चा महापालिकेवर काढण्याचे नियोजन केले. नाशिकरोड विभागिय कार्यालयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोर्चा तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. गांधीनगर येथील उपकार्यालयासमोर मनसेने आंदोलन केले. माकपने आयुक्तांना निवेदन देवून निषेध केला तर कॉंग्रेसने पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मनसे कडून आज पंचवटी कारंजावर घरपट्टी देयकांची होळी केली. करवाढीच्या आंदोलनाची धग वाढतं असताना आज दुपारी हॉटेल एमराल्ड पार्क मध्ये भाजप वगळता सर्वपक्षीय बैठक झाली. माकपचे जेष्ठ नेते डी. एल. कराड, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेते गजानन शेलार, माजी नगरसेवक ऍड. तानाजी जायभावे, मनसे शहराध्यक्ष अनिल मटाले उपस्थित होते. घरपट्टी वाढीच्या विरोधात नाशिककर म्हणून लढा उभारण्याचा निर्धार सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. 

लवकरच आंदोलन 
सन 2014 मध्ये मराठवाड्याला नाशिकचे पाणी पळविल्यानंतर भाजप विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. याच सरकारच्या काळात दुसऱ्यांदा सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चा काढण्यापुर्वी व्यापारी संघटना, निमा, नाईस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मर्चण्ट असोसिएशन आदी व्यापारी संघटनांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com