समको बँकेने साधली 'न्यूबा' अवार्डची हॅट्ट्रिक

रोशन खैरनार
रविवार, 4 मार्च 2018

बँकेचे संपूर्ण कामकाज पारदर्शी असून सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी व सर्व संचालक मंडळ दर्जा व गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच परिपाक म्हणून बँकेने 'न्यूबा' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची हॅट्ट्रिक साधली, याचे समाधान आहे.
- पंकज ततार, अध्यक्ष, समको बँक

सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स को - ऑपरेटीव्ह बँकेने सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा व आर्थिक निकषावर आधारित 'न्यूबा' अवार्ड हा पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे. ५० ते १०० कोटी रुपयांच्या ठेवी मिळविणाऱ्या बँकांच्या गटात समको बँकेने हा पुरस्कार मिळविला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष पंकज ततार यांनी काल शनिवार (ता.३) रोजी येथे दिली.

नाशिक जिल्हा सहकारी बँक असोसिएशनतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या बँकांना हा प्रतिष्ठेचा 'न्यूबा' अवार्ड दिला जातो. सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविणारी समको बँक ही जिल्ह्यातील पहिलीच बँक ठरली आहे. चंडीगड येथे आयोजित सहकारी बँक अधिवेशनातील विशेष समारंभात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सहकार भारतीचे प्रमुख सतीश मराठे, नाशिक जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्ष यशवंत अमृतकर, कॉन्फरन्सकमिटीचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे, विश्वास ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. बँकेने आर्थिक वर्ष २०१६ - १७ मध्ये केलेली गुंतवणूक, नेट एनपीए शून्य टक्के, लो कॉस्ट डीपोझीट, ग्रॉस एन.पी.ए., सी.डी. रेशो, ऑडीट संगणकीकरणाबरोबरच ऑडीट वर्ग अ, नफा व व्यवस्थापन या विविध निकषांमुळे समको बँकेची सलग तिसऱ्या वर्षी या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक रमेश देवरे, अशोक निकम, शरद सोनवणे, प्रकाश सोनग्रा व माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष पंकज ततार, संचालक व न्यूबाचे उपाध्यक्ष यशवंत अमृतकर, बँकेचे उपाध्यक्ष प्रवीण बागड, संचालक दिलीप चव्हाण, किशोर गहिवड, जयवंत येवला, जगदीश मुंडावरे, कैलास येवला, दिलीप येवला आदींनी पुरस्कार स्वीकारला.

बँकेचे संपूर्ण कामकाज पारदर्शी असून सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी व सर्व संचालक मंडळ दर्जा व गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच परिपाक म्हणून बँकेने 'न्यूबा' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची हॅट्ट्रिक साधली, याचे समाधान आहे.
- पंकज ततार, अध्यक्ष, समको बँक

Web Title: Marathi news Pune news samco bank