esakal | सातपाटील कुलवृत्तांत' लिहिण्याचा 20 वर्षांपासून प्रयत्न- रंगनाथ पठारे
sakal

बोलून बातमी शोधा

live

सातपाटील कुलवृत्तांत' लिहिण्याचा 20 वर्षांपासून प्रयत्न- रंगनाथ पठारे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः प्रत्येक कादंबरी हे आत्मचरित्र असते, असे सांगत कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी आज येथे "सातपाटील कुलवृत्तांत' ही प्रकाशित होणारी कादंबरी अधूनमधून लिहिण्याचा प्रयत्न मी 20 वर्षांपासून केल्याचे सांगितले. तसेच या कादंबरीच्या लेखनातील टप्प्यांचा पट त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे, कवी प्रकाश होळकर, लेखक अरविंद जगताप, प्रकाशिका सुमती लांडे यांनी रंगवलेल्या गप्पांच्या मैफलीत उलगडून दाखवला.

 
     सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ही मैफल झाली. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, आताच्या पिढीतील लेखक प्राजक्त देशमुख, दत्ता पाटील यांनीही प्रश्‍न विचारले. श्री. पठारे म्हणाले, की आजोबा कर्तबार शेतकरी होते. त्यांचे कर्तृत्व ऐकले होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुतुहल होते. वीस वर्षांपूर्वी पन्नास ते साठ पाने लिहिली होती. पण पूर्वजांचे गुणगान करायला नको म्हणून त्याचा विचार केला नाही. 2007 मध्ये पुन्हा जमेल असे वाटले आणि चार पिढ्यांबद्दल दोनशे पाने लिहिली. पुढे पाच वर्षे कौटुंबिक अडचणीत गेली. भालचंद्र नेमाडे ते आताचे कृष्णा खोत असा "स्प्रेक्‍ट्रम' घेऊन लेखन केले. तीन वर्षांपूर्वी चाळत होतो. तसेच वाचन करत मी माणूस म्हणून घडत होतो. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची महिकावती (माहीम)ची बखर वाचत असताना पाठारे नावाची जात वाचण्यात आली. ते कोण होते याचा शोध घेतला. पुढे चक्रधरांनी स्विकारलेल्या महानुभाव पंथापासून सुरवात करावी असे वाटले. अशातच, नगर जिल्ह्यातील वांबोरी गावात गेल्यावर माणिक पाठक गुरुजी भेटले. त्यांच्या रसाळ वाणीतून निजामशाहीच्या काळातील सातपाटीलांची गोष्ट ऐकण्यात आली. हा दुसरा टप्पा झाला

वाचकनिहाय कादंबरीतील वेगळी गोष्ट 
"सातपाटील कुलवृत्तांत' ही कादंबरी वाचलेल्यांपैकी सयाजी, लांडे आणि कवी नितीन भरद्वाज हे उपस्थित होते. लांडे यांनी कादंबरी प्रकाशित होणार असल्याने फार काही सांगू नये, असे म्हणताच, श्री. पठारे यांनी काही बिघडत नाही असे म्हणत कादंबरी एकच एक गोष्ट असत नाही, तर वाचकनिहाय वेगळी गोष्ट असते असे स्पष्ट करत त्याबद्दलचे उदाहरण दिले. ते म्हणाले, की चित्रकार श्रीधर मोरे भेटले असताना त्यांना कादंबरीविषयी सांगितले. मग दुसऱ्या दिवशी आम्ही मनमाडला कवी खलील मोमीन यांना भेटायला गेलो आणि त्यांनाही कादंबरी सांगितली. त्यावेळी उपस्थित असलेले श्रीधरराव यांनी काल वेगळीच गोष्ट सांगितली होती, असे आवर्जून सांगितले. 

अभिजात दर्जाचा विषय मंत्रालयात पडून 
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केलेल्या संशोधनाचा 400 पानांचा ग्रंथ तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीने केंद्र सरकारला सादर केला. साहित्य अकादमीच्या समितीने दावा मान्य केला. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा विषय केंद्रीय मंत्रालयात पडून आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी मराठीजणांना राजकीय दबाव वाढवावा लागेल, असे सांगून श्री. पठारे म्हणाले, की भाषा विकासासाठी निधीची आवश्‍यकता आहे. मराठी बोली भाषांच्या बळावर टिकून आहे. त्यामुळे बोली आणि सांस्कृतिक धन टिकणे आवश्‍यक आहे. 

पठारे म्हणतात..... 
भ्रमंती आणि संवाद हे माणसाला श्रीमंत करते आणि ते लेखनात येते 
पंजाब, हरियाना मध्ये महाराष्ट्राबद्दल आदराची भावना आहे 
कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत, बागपत भागातील यमुनाच्या दोन्ही काठावरील सुपीक जमिनींचे मालक मराठा आहेत. त्यांना पैसे खर्च करुन मराठी आपल्या मुलांना शिकवायची आहे 
कराचीतील एका इलाख्यात गरीब मराठी लोक राहताहेत. त्यांचे नातेसंबंध पुण्यातील खडकी भागात आहेत 
बंगाल, नागालॅंड, मिझोरामवासियांच्या भाषेचे मराठीशी साम्य आहे. पाच हजार शब्द एकमेकांसारखे आहेत 
सिंधू संस्कृती आणि मराठी भाषा यांच्यात एकमेकांबद्दल नाते आहे 

1983 मधील दीडशे पानांच्या "रथ' कादंबरी सूरतच्या प्रवासात महिलेच्या हसण्यातील सांस्कृतिक विधानातून गवसली 
कोल्हापूरचा किरण गुरव हा लेखक धग आंतर्मनात घेऊन लिहितो म्हणून तो मला आशादायी लेखक वाटतो 
साहित्य संस्कृतीच्या दुनियेत बदलाची सुरवात 1970 च्या दशकात झाली 
सांबराने झाडाला शिंगे घासावीत. मग झाडाच्या फांद्यात अडकलेली शिंगे सोडवण्याचा प्रवास होतो. अगदी तशी अवस्था कादंबरी लेखक आणि पात्रांची होत असते 

 

loading image