राजेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

त्र्यंबकेश्‍वर : त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडीत पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची घटना जातपंचायतीने तब्बल सव्वा महिना दाबण्याचा प्रकार उघडकीस आला. श्रमजीवी संघटनेने या अत्याचाराविरोधात सतत आवाज उठविल्याने पोलिसांनी गावातील दिनकर शिवा येले (वय 19) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

त्र्यंबकेश्‍वर : त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडीत पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची घटना जातपंचायतीने तब्बल सव्वा महिना दाबण्याचा प्रकार उघडकीस आला. श्रमजीवी संघटनेने या अत्याचाराविरोधात सतत आवाज उठविल्याने पोलिसांनी गावातील दिनकर शिवा येले (वय 19) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

जागतिक महिला दिनाच्या एक दिवस आधी हा प्रकार उघडकीस आला. नाशिक जिल्ह्यात आजही जातपंचायतीचे असलेले वर्चस्व उघड झाले. जातपंचायतीच्या प्रतिनिधीवर कारवाईची मागणी संघटनेने केली. 
याबाबत सविस्तर वृत्त असे, की नाशिक तालुक्‍यातील राजेवाडी-भोकरपाडा येथील पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर 23 जानेवारीला संशयित दिनकर शिवा येले याने जबरदस्तीने घरात घुसून अत्याचार केला होता. हा प्रकार पीडितीने घरच्या व्यक्तींना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची तयारी केली; परंतु हा प्रकार गावातील काही नागरिक व ठाकूर जातपंचायतीला समजल्यावर पीडितेच्या वडिलांना गुन्हा नोंदविण्यापासून परावृत्त करत दोघांचे लग्न लावून देण्याचे निश्‍चित केले. त्याबाबत कागदपत्रे तयार करण्यात आली. मात्र, मुलाच्या घरच्यांनी लग्न लावता येणार नसल्याची चर्चा घडवून आणली. मुलीच्या वडिलांनी मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्याने जातपंचायतीच्या पंचांनी त्यांना धमक्‍या देत वाळीत टाकण्याचे आणि त्यांच्याशी संबंध तोडण्याचे जाहीर केले. एकाकी पडलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हा प्रकार श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांना समजल्यानंतर त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला आणि हा प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत त्यांनी संबंधित जातपंचायत आणि तिच्या पंचांवर कारवाईची मागणी केली. अखेर बुधवारी (ता. 7) त्र्यंबकेश्‍वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासोबतच जातपंचायतीचेही हे प्रकरण असून, संबंधित जातपंचायतीच्या पंचांना सहआरोपी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. 
- भगवान मधे, श्रमजीवी संघटना 

Web Title: MARATHI NEWS RAPE CASE