केळी उत्पादकासाठी खुशखबर..अपेडा संस्था अनुदान देणार

banana production
banana production

रावेर : महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचा सहभाग असलेल्या अपेडा या संस्थेतर्फे केळी निर्यातीसाठी महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे. निर्यातीसाठी आवश्यक त्या प्रक्रियांसाठी अनुदान देणार असल्याची माहिती दिल्ली येथील अपेडाच्या अधिकारी डॉ. शोभना कुमार यांनी दिली. 
त्रिची (तामिळनाडू) येथे जागतिक केळी परिषदेच्या आज तिसऱ्या आणि अंतिम दिवशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. डॉ. शोभना कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊसेस, कंटेनर उपलब्धी व केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती यासाठी अनुदान व अर्थसहाय्य ही देण्यात येईल. आंध्र आणि गुजरात या राज्यांसाठीही अपेडा विविध योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. 
आज जागतिक केळी परिषदेतील तांत्रिक सत्राची समाप्ती झाली. आजच्या दिवसभरातील सत्रात डॉ. जेम्स डेल (ऑस्ट्रेलिया) यांनी केळीवर पडणारा पनामा हा रोग जगभर थैमान घालत असल्याचे सांगून आगामी दोन वर्षात या रोगाला प्रतिकार करणारी जात बाजारपेठेत आणणार असल्याचे सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे तज्ज्ञ डॉ. अल्टस व्ही जॉन म्हणाले की, पनामा या रोगाला १९०६ पासूनचा इतिहास आहे. फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांची अर्थव्यवस्था केळीवर आलेल्या पनामा रोगाने मोडकळीस आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. आर थांगवेलू यांनी सांगितले की, पनामा हा रोग भारतातही उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, तमिळनाडू आणि मध्य प्रदेशात पसरत असून, त्याचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागाने धोरण आखण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञ श्री. जॉन यांनी सांगितले की, युरोपमध्ये भारतीय केळीला निर्यातीची मोठी संधी आहे. तामिळनाडूतून नुकताच एक कंटेनर यूरोपमध्ये यशस्वीरीत्या निर्यात झाला असून, आगामी काळातही निर्यातीची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या (ता. २५) केळी परिषदेला गेलेले देशविदेशातील शेतकरी आणि तज्ज्ञ तामिळनाडूतील "टेनी" या जगप्रसिद्ध केळी उत्पादक विभागाला भेट देऊन केळीचे उत्पादन व निर्यात याबाबतची माहिती घेणार आहेत. 

के. बी. पाटील यांना पुरस्कार 
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांना आज "बेस्ट टेक्नॉलॉजी डेसिमीनेटर अवॉर्ड २०२०" देऊन गौरविण्यात आले. श्री. पाटील यांनी केळी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करून देशातील व देशाबाहेरील केळी उत्पादकांना तंत्रज्ञान पोहोचवण्यात मोठे योगदान दिले. देशाचे केळी विषयक धोरण तयार करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचा उल्लेख करून त्यांना डॉ. बी. एम. सी. रेड्डी आणि डॉ. फसील हुसेन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com