तिकीट मिळो ना मिळो जनता माझ्या पाठिशी : आमदार खडसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

रावेर : मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळो अगर ना मिळो, जनता व कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. लोकसभेत रावेर विधानसभा निवडणुकीत पक्षाला चाळीस हजाराचे लीड मिळाले ते ऐंशी हजाराचे मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत जेणे करून पक्षातील अंतर्गत व बाहेरील विरोधकांना चपराक बसेल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे केले. 

रावेर : मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळो अगर ना मिळो, जनता व कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. लोकसभेत रावेर विधानसभा निवडणुकीत पक्षाला चाळीस हजाराचे लीड मिळाले ते ऐंशी हजाराचे मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत जेणे करून पक्षातील अंतर्गत व बाहेरील विरोधकांना चपराक बसेल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे केले. 

रावेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री.खडसे म्हणाले की, आपल्यावर अन्याय झाला आहे. याबाबत मी बोलणारच, मात्र आपण जे रोपटे लावले व वाढवले त्या भाजपला जिल्ह्यात व राज्यात सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करू. भ्रष्टाचार केला नाही किंवा मोठ्या संस्था स्थापन केल्या नाही. आता पर्यंत जिल्ह्यात १७ खासदार निवडून दिले. तरीही पक्ष असा का वागतो हे मला अद्याप कळाले नाही. माझ्यावर सीबीआय, इनकम टॅक्सची चौकशी झाली, एवढेच नव्हे तर दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडून चौकशी झाली. त्यातही काही तथ्य आढळले नाही, असे असताना विधानसभेत भाषण केले त्यावरही सरकारने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिली नसल्याची खंत व्यक्त केली. 

चाळीस वर्ष जे रोपटे वाढवले ते सोडणार नाही. माझ्यावरील अन्यायाबाबत बोलणारच, राज्यात जेथे भाषणे होतील तेथे हे मुद्दे मांडणारच, राज्यात भाजपाचेच सरकार येणार असे सांगून रावेर विधानसभेसाठी हरीभाऊ जावळे यांनाच उमेदवारी मिळेल, याबाबत कोणत्याही कार्यकर्त्यांनी शंका बाळगू नये असेही ते म्हणाले. 

आमदार हरिभाऊ जावळे म्हणाले की, रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अजून संपलेली नाही. हा मतदारसंघ भाजप आणि काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभेची व विधानसभेची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा संघटन मंत्री सुनील नेवे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी विचार मांडले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, शिवाजी पाटील, वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, अनिता चौधरी, रंजना पाटील, नंदा पाटील, कैलास सरोदे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver bjp medava khadse ticket