हतनूर'ची वाटचाल मृत प्रकल्पाकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

रावेर ः जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त गावांना आणि रेल्वे, दीपनगर औष्णिक वीज प्रकल्प, वरणगाव, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्‍टरी, जळगाव औद्योगिक वसाहत यांना पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर प्रकल्पात पाणी कमी आणि गाळ जास्त असल्याची वस्तुस्थिती अधिकारी मान्य करतात; तर दुसरीकडे मृत पाणीसाठ्याची चुकीची आकडेवारी देऊन प्रशासन आणि प्रसिद्धी माध्यमांची दिशाभूल करण्यात येत आहे. राजकारण बाजूला ठेवून येत्या काळात प्रकल्पातील गाळ कमी करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर लवकरच हा प्रकल्प मृतावस्थेत जाईल, अशी स्थिती आहे. 

प्रकल्पात 132.10 आज सकाळी आठला मृत पाणीसाठा असल्याचे आणि जिवंत पाणीसाठा संपल्याचे सांगण्यात आले. 1982 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला, तेव्हा यात 214 मीटर पाण्याची पातळी असताना एकूण क्षमता 388 दशलक्ष घनमीटर इतकी होती. यात 255 दशलक्ष घनमीटर इतका जिवंत पाणीसाठा आणि 133 दशलक्ष घनमीटर इतका मृत साठा अपेक्षित होता. 

पूर्णेतून गाळ 
हा प्रकल्प तापी आणि पूर्णा या दोन मोठ्या नद्यांच्या संगमावर उभारण्यात आला आहे. पूर्णा नदीतून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येतो. सध्या तरी राज्यातील सर्वाधिक गाळ असलेला प्रकल्प म्हणून "हतनूर'ची ओळख आहे. नाशिकच्या मेरी या संस्थेने 2007 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात या प्रकल्पाची क्षमता 213.30 दशलक्ष घनमीटर इतकी, जिवंत पाणीसाठा 188.63 आणि मृत पाणीसाठा 24.67 दलघमी इतका होता. म्हणजे या प्रकल्पात त्यावेळी 174.7 दलघमी इतका गाळ होता. या प्रकल्पात दरवर्षी 7 दशलक्ष घनमीटर गाळ वाढत जाईल, असेही अहवालात म्हटले होते. म्हणजे गेल्या 11 वर्षांत या प्रकल्पात आणखी 77 दलघमी गाळ जमा होऊन तो एकूण 251.7 दलघमी इतका आणि पाणीसाठा फक्त 136.3 दलघमी इतकाच आहे. 

आकडेवारीत दिशाभूल 
प्रकल्पात आज मृत पाणीसाठा 132.10 दलघमी सांगण्यात येतो. प्रत्यक्षात त्यात गाळ किमान शंभर दलघमी इतका आहे. पाऊस लांबल्यास आणीबाणीच्या वेळी ही चुकीची आकडेवारी प्रशासनाला अडचणीत आणू शकते. 

गाळाचे नियोजन नाही 
या प्रकल्पात असलेला गाळ वाहून नेण्यासाठी आणि पूर परिस्थितीत प्रकल्पातील पाणीसाठा लवकर कमी करण्यासाठी प्रकल्प पातळीच्या दीड मीटर खाली 8 दरवाजे तयार करण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, यात राजकारण आल्याने निधीअभावी काम बंद पडले आहे. या कामाबद्दलची माहिती प्रकल्प कार्यालयातही उपलब्ध नाही. मात्र, हे काम प्राधान्याने करण्याची गरज आहे. हे दरवाजे पूर्ण झाले, तर किमान दरवर्षी प्रकल्पात नव्याने वाहून येणारा पुढे गाळ वाहून जाईल. यामुळे प्रकल्पाचे आयुष्य वाढेल. घट्ट बसलेला जुना चिकट गाळ वाहून जाण्यासाठी मात्र मोठा कालावधी लागेल. 

तापीत एक आवर्तन 
जिवंत पाणीसाठा संपला, तरीही मृतसाठ्यातून प्रकल्पाचे खालचे दरवाजे उघडून 9 दशलक्ष घनमीटरचे एक आवर्तन सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. त्यासाठी भुसावळहून मागणी नोंदविण्यात आली आहे. याचा फायदा भुसावळ, यावल, चोपडा, अमळनेर, धरणगाव, भुसावळ रेल्वे, दीपनगर, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्‍टरी यांना होईल. याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेतील. 

Web Title: marathi news raver hatnur dam